पुणे, : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)चे उद्घाटन गुरुवारी १५ जानेवारी रोजी संध्याकाळी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे मुख्य सचिव श्री किरण कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील , महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी आणि विविध देशांचे कॉन्सुल जनरल यावेळी उपस्थित राहणार असल्याचे महोत्सवाचे संचालक आणि अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर होत असून, त्याचे उद्घाटन १५ तारखेला संध्याकाळी ५ वाजता विद्यापीठ रस्त्यावरील इ स्क्वेअर थिएटर येथे होणार आहे. यावेळी निकिता मोघे दिग्दर्शित हिंदी गाण्याच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महोत्सवाच्या थीमचे आणि कॅटलॉगचे अनावरण होणार आहे.
यावेळी विविध देशांचे कॉन्सुल जनरल, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त, महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी बी. जयमोहन, नसीम अहमदपोर, पिटर केरेकेस, रीट्टा आल्टो, सिनू रामासामी, सेर्गी कासामीतजाना, येसिम उस्ताओग्लू उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमानंतर ‘ला ग्राझिया’ (इटली) हा पावलो सोरेंटीनो दिग्दर्शीत चित्रपट दाखवण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रम निमंत्रीतांसाठी असून, त्यानंतर दाखवण्यात येणारा चित्रपट रजिस्ट्रेशन केलेल्यांसाठीच आहे.
महोत्सवाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.piffindia.com या संकेतस्थळावर तसेच सर्व थिएटर्सवर प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.


