पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मशीन बदलल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक झाल्या होत्या. या गोंधळामुळे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतमोजणी केंद्रावरील प्रक्रिया जवळपास एक तासाहून अधिक काळ थांबवण्यात आली होती.
मतमोजणी थांबवल्यानंतर ठोंबरे यांनी थेट मतमोजणी केंद्राच्या गेटवर चढत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली.
दरम्यान, सर्व गोंधळानंतर प्रभाग क्रमांक २५ मधील अंतिम निकाल जाहीर झाला असून, येथून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांचा या प्रभागातून पराभव झाला आहे. भाजपकडून राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी विजय मिळवला आहे.
भाजपवर गंभीर आरोप
निकालानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भारतीय जनता पार्टीने हे सर्व नियोजनबद्धरित्या घडवून आणले आहे. आम्हाला या मतमोजणी प्रक्रियेवर विश्वास नाही. त्यामुळे भाजप वगळता सर्व उमेदवारांनी या मतमोजणीवर बहिष्कार टाकला आहे,” असा आरोप ठोंबरे यांनी केला.
प्रभाग २५ मधील या निकालामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण अधिक तापले असून, या प्रकरणावरून पुढील काळात आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


