पुणे : शहरात वाढत्या IVF (संतती उपचार) सेंटरमधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि औषध विक्रीतील अनियमितता यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले.

पुणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर IVF सेंटर सुरू झाली आहेत. संतती उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक ठिकाणी आवश्यक औषधे संबंधित सेंटरमधूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे ही औषधे बाहेरील वैद्यकीय दुकानांमध्ये उपलब्ध नसल्याचेही रुग्णांचे म्हणणे आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या जोडप्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही IVF सेंटरशी संबंधित सोनोग्राफी केंद्रांमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात असल्याचीही चर्चा शहरात सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. उरळी कांचन येथील दीप्ती चौधरी या महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर वडगाव शेरी परिसरातील एका नामांकित रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी झाल्याची चर्चा असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सोनोग्राफी सेंटरची वर्षातून दोन वेळा तपासणी केली जाते. मात्र ही तपासणी केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ठराविक नमुन्यात माहिती भरून घेणे, रेकॉर्डची वरवर तपासणी करणे आणि किरकोळ नोटीस देऊन कारवाई पूर्ण झाल्याचे दाखवले जाते, अशीही टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील सर्व IVF व सोनोग्राफी सेंटरची संयुक्त आणि सखोल विशेष तपासणी मोहीम राबवावी, औषध विक्री आणि बिलिंग प्रक्रियेची अन्न व औषध प्रशासनामार्फत चौकशी करावी तसेच PCPNDT कायद्यांतर्गत गर्भलिंग निदान चाचण्यांबाबत विशेष तपास पथक नियुक्त करावे, अशी मागणी सुरवसे यांनी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेंटरची मान्यता तात्काळ निलंबित अथवा रद्द करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुणे शहरासह जिल्ह्यातील IVF सेंटरची झाडाझडती घेतली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सुरवसे यांनी सांगितले. तसेच या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


