33.1 C
New Delhi
Friday, May 8, 2026
HomeTop Five Newsदहावीच्या निकालात मुलींचा दबदबा

दहावीच्या निकालात मुलींचा दबदबा

राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, कोकण विभाग पुन्हा अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येत आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिभूवन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती जाहीर केली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते. निकाल जाहीर करताना मंडळाकडून यंदाच्या परीक्षेतील विविध आकडेवारी आणि विभागनिहाय निकालाची माहिती देण्यात आली.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांना वेळेत निकाल उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस आधी घेण्यात आली होती. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली. निकाल प्रक्रियेत अचूकता आणि विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी राज्य मंडळाच्या स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात आली होती.

निकालाच्या आकडेवारीनुसार, यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८९.५६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ५.४० टक्क्यांनी अधिक ठरला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.६२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखली आहे. त्याखालोखाल कोल्हापूर विभागाचा ९५.४७ टक्के आणि मुंबई विभागाचा ९४.९७ टक्के निकाल लागला आहे. पुणे विभागाने ९४.२४ टक्के निकालासह चांगली कामगिरी केली आहे.

दुसरीकडे, सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला असून तो ८८.४१ टक्के आहे. लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के तर नागपूर विभागाचा ८९.०७ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९०.५३ टक्के आणि अमरावती विभागाचा निकाल ९०.५० टक्के लागला आहे.

विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

  • कोकण – ९७.६२%
  • कोल्हापूर – ९५.४७%
  • मुंबई – ९४.९७%
  • पुणे – ९४.२४%
  • नाशिक – ९०.५३%
  • अमरावती – ९०.५०%
  • नागपूर – ८९.०७%
  • लातूर – ८८.४२%
  • छत्रपती संभाजीनगर – ८८.४१%

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.०१ टक्क्यांची घट झाल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. तरीदेखील राज्याचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
33.1 ° C
33.1 °
33.1 °
31 %
4.1kmh
0 %
Fri
33 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
43 °
Tue
44 °

Most Popular

Recent Comments