पुणे, : कर्करोग नियंत्रणासाठी कार्य करणारी भारतातील पहिली स्वयंसेवी आणि ना-नफा तत्त्वावरील संस्था इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस) यांच्या प्रमुख बालक कर्करोग सर्व्हायव्हरशिप उपक्रम ‘उगम’च्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबईतील ५२५ पेक्षा जास्त कर्करोग विजेते, त्यांचे कुटुंबीय, आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ, समर्थक आणि हितचिंतक सहभागी झाले होते.
२००९ मध्ये स्थापन झालेल्या ‘उगम’ची पायाभरणी एका साध्या पण प्रभावी विश्वासावर झाली होती. कर्करोगावर मात करणे हा प्रवासाचा शेवट नसून, नव्या संधी, स्वप्ने आणि उद्दिष्टांनी भरलेल्या आयुष्याची सुरुवात आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयातील कर्करोग विजेत्यांच्या एका गटाने इंडियन कॅन्सर सोसायटीच्या स्वयंसेवी सहाय्य गटाच्या रूपाने या उपक्रमाची सुरुवात केली.
‘उगम’च्या प्रेरणादायी प्रवासातून प्रेरणा घेत इंडियन कॅन्सर सोसायटीने देशभरात १९ ऍक्ट क्लिनिक्स सुर करण्यास मदत केली असून, त्यामध्ये ४,००० पेक्षा जास्त कर्करोग विजेत्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ‘प्रोजेक्ट पिकासो’ या उपक्रमाच्या माध्यमातून उपचारानंतरच्या आयुष्यातही कर्करोग विजेत्यांना आवश्यक आधार आणि मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वैद्यकीय व्यवहार विभागाच्या उपमहासंचालक) डॉ. वंदना धामणकर यांनी दिली.
यंदाच्या वर्धापनदिन सोहळ्याची संकल्पना महाभारतातील संघर्ष, धैर्य, मैत्री आणि संकटांवर मात करून मिळविलेल्या विजयाच्या प्रेरणेतून साकारण्यात आली होती. ‘संघर्ष से साहस तक’ ही यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या कर्करोग विजेत्यांचा प्रेरणादायी प्रवास या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमातील प्रत्येक घटकाने या संकल्पनेचा आशय प्रभावीपणे उलगडून दाखविला.
“या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर टाटा मेमोरियल सेंटरचे ‘डीन – अकॅडमिक प्रोजेक्ट्स’ आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. कैलाश शर्मा यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. याप्रवासा सोहळ्याला इंडियन कॅन्सर सोसायटीचे विश्वस्त, देणगीदार, समर्थकांसह वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित कर्करोग तज्ज्ञ आणि मानसोपचार-कर्करोग तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
याप्रसंगी बोलताना ‘उगम’च्या निमंत्रक डॉ. पूर्णा ए. कुरकुरे म्हणाल्या, “भारतात दरवर्षी हजारो बालकांना कर्करोगाचे निदान होते. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज कर्करोगातून बरे होणाऱ्या मुलांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मात्र, उपचार पूर्ण झाल्यानंतरचे त्यांचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. ‘सर्व्हायव्हरशिप’ (कर्करोगावर मात केल्यानंतरचे जीवन) म्हणजे या तरुण मुलांना निरोगी, उत्पादनक्षम आणि समृद्ध जीवन जगण्यास मदत करणे होय. ‘उगम’ हे एक असे व्यासपीठ बनले आहे, जिथे या मुलांना एकमेकांचा पाठिंबा, योग्य मार्गदर्शन, मैत्री आणि मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास मिळतो. त्यांचे हे संघर्षमय प्रवास आपल्याला दाखवून देतात की, कर्करोग कोणत्याही मुलाचे भविष्य ठरवू शकत नाही.”


