सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या शाश्वत उपक्रमामुळे १५ हजार पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगार, ५० कोटींची वार्षिक उलाढाल
पुणेसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील रोजगारनिर्मितीचा सुयश चॅरिटेबल ट्रस्टचा शाश्वत आदर्श
पुणे : पुणे, पालघर, नंदुरबारसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक संसाधनांवर आधारित रोजगारनिर्मिती आणि वनवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. सन १९९० च्या सुमारास देशी आंब्यापासून आमचूर तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव प्रयोग सुरू करण्यात आला. पारंपरिक अन्नप्रक्रिया, जैविक शेती, स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

मोलगी परिसरात सुयश चॅरिटेबल ट्रस्टने वनवासी शेतकऱ्यांना जैविक शेती, प्रक्रिया तंत्रज्ञान, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, बाजारपेठ व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींचे प्रशिक्षण दिले. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे स्थानिक देशी आंब्यांपासून आमचूर उत्पादनाचा उद्योग विकसित झाला असून हजारो वनवासी कुटुंबांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी स्थलांतराचे प्रमाणही कमी झाले आहे.
आज सुमारे ४० ग्रामपंचायतींतील ३५० हून अधिक पाड्यांमधील १० ते १५ हजार वनवासी शेतकरी देशी आंब्यापासून आमचूर तयार करून विक्री करत आहेत. उन्हाळ्यातील अवघ्या एक ते दोन महिन्यांत प्रत्येक कुटुंबाला सरासरी २० ते २५ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घरखर्चासाठी आर्थिक आधार उपलब्ध होत असून स्थानिक रोजगारालाही चालना मिळत आहे.
या परिसरातून दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा आमचूर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली तसेच उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळत असून स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
सुयश चॅरिटेबल ट्रस्टने स्वच्छ प्रक्रिया, सुधारित वाळवण तंत्र, दर्जा नियंत्रण आणि बाजारपेठ उपलब्धतेचे प्रशिक्षण देऊन उत्पादनाचा दर्जा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वयंसहायता गट आणि उत्पादक संघटनांच्या माध्यमातून वनवासी समाजाचे संघटन, पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि जैवविविधतेचे संवर्धन करत शाश्वत ग्रामीण विकासाचा आदर्श उभा केला आहे. सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास व स्मिता घैसास आणि कार्याध्यक्ष शलाका घैसास यांनी या उपक्रमाची माहिती दिली.


