38.7 C
New Delhi
Friday, July 17, 2026
Homeमनोरंजनभरतनाट्यमच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवली पांडुरंगाची उपासना

भरतनाट्यमच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवली पांडुरंगाची उपासना

फ्युएल शिक्षण संस्थेतर्फे ‘माऊली – एक कालातीत परंपरा’

आंतरराष्ट्रीय नृत्यांगना कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर यांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध

पुणे, : चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभाव, हातांच्या विशिष्ट मुद्रा, लय-तालातील पायांच्या गुंतागुंतीच्या हालचाली आणि शास्त्रीय संगीताच्या साथीने सादर झालेल्या भरतनाट्यममधून पांडुरंगाच्या भक्तीने पुणेकर अक्षरशः न्हाऊन निघाले.

फ्युएल शिक्षण संस्थेतर्फे एमईएस सभागृहात ‘माऊली – एक कालातीत परंपरा’ या भक्ती, परंपरा, कला व ईश्वर यांच्यातील संबंधाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. पंढरपूर वारीचा आत्मा जिवंत करणारी ही कला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका आणि संशोधक कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर यांच्या विशेष सादरीकरणातून अनुभवायला मिळाली.

कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर यांनी आपल्या नृत्यातून पांडुरंग आणि भक्त यांच्यातील भावबंध उभा केला. डोळे व चेहऱ्यावरील हावभावांइतकेच हातांच्या मुद्रांमधून त्यांनी भक्तीची गहिराई व्यक्त केली. या नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्व एकरूप असल्याची अनुभूती प्रेक्षकांना झाली.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या विविध अभंग, ओव्या आणि भारुडांवर आधारित नृत्य सादर करण्यात आले. ‘उदंड पाहिले उदंड ऐकिले’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘खेळ मांडियला वाळवंटी घाई’, ‘कशी जाऊ मी वृंदावन’ आणि ‘मुरली वाजवितो कान्हा’ यांसारख्या रचनांचा यात समावेश होता. अध्यात्माने समृद्ध असलेल्या भरतनाट्यमच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा इतिहास, संस्कृती आणि विविध भावभावना प्रभावीपणे मांडण्यात आल्या.

या प्रसंगी फ्युएल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे, फ्युएल शिक्षण संस्थेच्या सीईओ मयूरी देशपांडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सीईओ सचिन अंबरडीकर, अमित वाजगे,
चंद्रशेखर बलरामन, तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर म्हणाल्या:
“प्रत्येक कलाकाराला समाजाकडून प्रेरणा आणि पाठबळ मिळत असते. त्यामुळे समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी कलाकारांची आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी फ्युएल शिक्षण संस्था करत असलेल्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी मी अमेरिकेतून भारतात आले आहे. या कार्यक्रमासाठी मी कोणतेही मानधन स्वीकारलेले नाही.”

डॉ. केतन देशपांडे, संस्थापक अध्यक्ष, फ्युएल शिक्षण संस्था म्हणाले: “वंचित आणि ग्रामीण भागातील महिलांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांचा भाग म्हणून दरवर्षी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. प्रेक्षकांकडून प्रवेश शुल्क आकारण्याऐवजी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व सुलभ व्हावा, यासाठी विविध कॉर्पोरेट संस्थांकडून प्रायोजकत्व मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

भक्ती योग केवळ वैयक्तिक आध्यात्मिक प्रगतीपुरता मर्यादित नसून तो इतरांचे जीवन उन्नत करण्याची प्रेरणा देतो. ‘माऊली’ प्रकल्पाबद्दल मी अभिमान व्यक्त करतो. शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या उपक्रमांना भविष्यातही आमचा पाठिंबा कायम राहील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला दाद दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
38.7 ° C
38.7 °
38.7 °
25 %
4.2kmh
71 %
Thu
38 °
Fri
41 °
Sat
39 °
Sun
40 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments