नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच वारसा कराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला धारेवर धरले. “इंदिरा गांधी यांच्या संपत्तीसाठी राजीव गांधींनी वारसा कर कायदा रद्द केला होता”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी केला आहे. वारसा कराबाबत मी आज तुमच्या समोर एक मोठं तथ्य मांडत आहे. ही वस्तुस्थिती डोळे उघडणारी आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. पण त्यावेळी असा कायदा होता की, मुलांना संपत्ती मिळताना त्यातील काही भाग सरकारकडे जात होता. काँग्रेसने त्याकाळी असा कायदा केला होता. तेव्हा अशी चर्चा होती की, इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधींना त्यांची संपत्ती मिळणार होती. पण त्यातील काही संपत्ती सरकारकडे जाऊ नये, म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वारसा कायदा रद्द केला आणि संपत्ती वाचवली”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.