
पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणे व बाबुराव पुसाळकर संगीत गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मेघरंग संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. विजयराव पुसाळकर यांना संगीत समारोहाद्वारे स्वर श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे दिली.
मेघरंग संगीत समारोह गुरुवार, दि. 25 आणि शुक्रवार, दि. 26 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्याल, पुणेच्या विष्णु विनायक स्वरमंदिरात होणार आहे. गुरुवारी (दि. 25) पहिल्या सत्रात संदीप आपटे यांचे सतार वादन होणार असून दुसऱ्या सत्रात गौरी पाठारे यांचे गायन होणार आहे. भरत कामत, हृषिकेश जगताप (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. शुक्रवारी (दि. 26) पहिल्या सत्रात जयंत केजकर यांचे तर दुसऱ्या सत्रात संदीपन समाजपती यांचे गायन होणार असून त्यांना श्रीपाद शिरवळकर, भरत कामत (तबला), पं. प्रमोद मराठे, स्वानंद कुलकर्णी (संवादिनी) साथ करणार आहेत. कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी खुला आहे.
