पुणे : नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र कार्यालय, तसेच पुण्यासह राज्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी व इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याच्या महसूल विभागाला नागरिक दस्त नोंदणीच्या माध्यमातून प्रचंड महसूल निर्माण करून देत असतात.मात्र, सर्वसामान्य नागरिकांना दस्त नोंदणी कार्यालयामध्ये साधी बसायची सोय उपलब्ध नसल्याचे अनेक ठिकाणी आढळते.
नोंदणी महानिरीक्षकांच्या कार्यालयात नागरिकांसाठी प्रतिक्षा कक्ष उपलब्ध नाही. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. काही कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. परंतू, सद्यस्थितीत ते बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
राज्यभरातील बऱ्याच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे नोंदणी कार्यालयात नागरिकांना पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रतिक्षा कक्ष उपलब्ध करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे. यावेळी पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे, दीपक चौगुले हे उपस्थित होते.
कोट :
दस्त नोंदणीच्या माध्यमातून हजारो कोटींचा महसूल नागरिकांमुळे प्रशासनाला मिळत असतो. नोंदणी महानिरीक्षक कार्यालय व राज्यातील अनेक दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सिसीटीव्ही कॅमेरा, प्रतिक्षा कक्ष ह्या गोष्टींची पूर्तता जर अधिकारी करू शकत नसतील तर खेदाची बाब आहे. नागरिकांसाठी तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही आमची मागणी आहे.
- रोहन सुरवसे पाटील
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस