मुंबई : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी, समाजसुधारक आणि लोकशाही मूल्यांचे पुरस्कर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “देशहित, सामाजिक अस्मिता आणि लोकशाही यांचे रक्षण करण्यासाठी स्वातंत्र्य संग्राम पुढे नेणारे सेनानी म्हणून आपण लोकमान्य टिळक यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो. त्यांनी ‘केसरी’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला धाडसाने आव्हान दिले, तर ‘गीतारहस्य’ या ग्रंथातून समाजाला कर्मयोगाचा मार्ग दाखवला. लोकमान्यांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देतो. महाराष्ट्रात त्यांच्या विचारांची परंपरा आजही तितक्याच ताकदीने जिवंत आहे. जयंतराव टिळक यांनी विधान परिषदेचे सभापती म्हणून केलेले कार्य लक्षणीय आहे, आणि विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने मला आज लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्याचा सन्मान लाभला आहे.”
विधान भवनात आयोजित या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार संजय खोडके, विधानसभा आमदार सुलभा खोडके, सचिव (कार्यभार-१) जितेंद्र भोळे, सचिव (कार्यभार-४) शिवदर्शन साठ्ये, उपसभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने तसेच इतर मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.