‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार
पुणे : डिफेन्स फोर्स लीग (डीएफएल) आणि डीआयएफटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपल्या सैन्याला समजावून घ्या’ या संकल्पनेवर आधारित आणि ‘वॉल ऑफ हिरोज’ या जागतिक विक्रमी मोहिमेच्या अधिकृत शुभारंभासाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘डिव्हाईन एव्हिएशन एज्युकेशन अँड कल्चर समिट’मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व दूरदृष्टीपूर्ण योगदानाबद्दल एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ, पुणेला डीएफएलचा प्रतिष्ठेचा ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान विद्यापीठाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी स्वीकारला.
कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय परिषदेत माजी हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अरुणाचल प्रदेश व मिझोरामचे सन्माननीय राज्यपाल तसेच इंडियन एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष एअर मार्शल शशीकुमार रामदास (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, व्हीएसएम) यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमात उपस्थितांना लाभले.
या प्रसंगी नागरी विमान वाहतूक उपमहासंचालिका श्रीमती सुवरिता सक्सेना, मिग–२१ विमानावर सर्वाधिक उड्डाण तासांचा जागतिक विक्रम करणारे एअर कमोडोर सुरेंद्र त्यागी (वायुसेना पदक), तसेच भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते व पद्मश्री सन्मानित मुरलीकांत पेटकर हे मान्यवर उपस्थित होते. संरक्षण, शिक्षण, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ज्ञांनी परिषदेत सहभाग नोंदवला.
एमआयटी एडीटी विद्यापीठाने उच्च शिक्षणात नवोन्मेष, कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन व उद्योगस्नेही उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर केलेल्या योगदानाची दखल घेत डीएफएलतर्फे हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षणातून राष्ट्र उभारणीचा विचार प्रत्यक्ष कृतीतुन साकार करण्याची विद्यापीठाची भूमिका प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
परिषदेस प्रारंभी १९७१ च्या युद्धातील शहीदांसह भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले यांना एनसीसी कॅडेट्सकडून विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. याच मंचावर डीएफएल आणि डीआयएफटी फाऊंडेशनतर्फे भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथांना समर्पित ‘वॉल ऑफ हिरोज’ ही महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहीम अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड आणि कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या नेतृत्वात एमआयटी एडीटी विद्यापीठाला मिळालेला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार हा विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था, सामाजिक बांधिलकी आणि देशहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.


