पिंपरी :-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवले आहे. आळंदीतील संजीवन समाधी मंदिराजवळील माऊलींच्या आजोळ घरी झालेल्या पारंपरिक मुक्कामानंतर, भक्तिरसात न्हालेल्या अभंगवाणीत आणि माऊली-माऊलीच्या जयघोषात पालखीने पुण्यनगरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
काल, १९ जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास, मंदिराची प्रदक्षिणा करून पालखीने महाद्वारातून बाहेर पडत भरावरस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वार चौक असा मार्ग घेत ‘दर्शन मंडप’ अर्थात ‘आजोळ घरी’ मुक्काम केला.
आज, २० जून रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास माऊलींच्या अश्वांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर खांद्यावर उचलून पालखी पालिका चौकापर्यंत नेण्यात आली. सव्वा सातच्या सुमारास रथात विराजमान झालेल्या पालखीने, भक्तांच्या गगनभेदी जयघोषात, पुण्यनगरीकडे प्रस्थान केले.
संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हालं असून, हजारो वारकरी, भाविक आणि भक्तजन माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी पुण्यनगरीकडे मार्गस्थ झाले आहेत.
पुण्यनगरीच्या दिशेने निघालेला हा लखी सोहळा, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा जिवंत अनुभव देणारा ठरतो आहे.