नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि लाइन ४-अ (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांना मंजुरी देण्यात आली. लाइन २अ (वनाज-चांदणी चौक) आणि लाइन २ब (रामवाडी-वाघोली/विठ्ठलवाडी) यांच्या मंजुरीनंतर फेज २ अंतर्गत मंजूर झालेला हा दुसरा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 9857.85 कोटींच्या निधीला देखील मंजूरी देली आहे.
४ व ४-अ या दोन्ही लाइन्सचे एकूण 31.63 किमीचे अंतर असून यामध्ये 28 एलिव्हेटेड स्टेशन्सचा समावेश असणार आहे. यामुळे पूर्व, दक्षिण व पश्चिम पुण्यातील आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था व निवासी क्लस्टर्स जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी पाच वर्षांची मुदत असून या प्रकल्पाचा निधी केंद्र, राज्य व निधी संस्थांकडून वितरित होणार आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) द्वारे राबविला जाणार आहे. महामेट्रो सर्व नागरी, विद्युत, यांत्रिक आणि प्रणाली-संबंधित कामे करेल. स्थलाकृतिक सर्वेक्षण आणि तपशीलवार डिझाइन सल्लामसलत यासारख्या बांधकामपूर्व प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आल्या आहेत. या ताज्या मंजुरीमुळे, पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा जास्त होईल, जे शहराच्या आधुनिक, एकात्मिक आणि शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेच्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल आहे.
कुठून कुठे जोडणार मेट्रो ?
मंजूरी देण्यात आलेल्या दोन्ही लाइन्स या खराडी आयटीपार्कपासून खडकवासला या पर्यटनस्थळापर्यंत तर हडपसरच्या औद्योगिक केंद्रापासून वारजेच्या निवासी क्लस्टरपर्यंत जोडण्यात येणार आहेत. सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता व मुंबई-बंगळुरू महामार्गावरुन जाणारी मेट्रो पुण्यातील वर्दळीच्या मार्गांवरील गर्दी कमी करणार आहे.
हा विस्तार खराडी बायपास, लाइन २ वरील नळ स्टॉप आणि लाइन १ वरील स्वारगेट येथे इंटरचेंज पॉइंट्ससह विद्यमान आणि मंजूर कॉरिडॉर जोडण्यासाठी डिझाइन केला आहे. तो हडपसर रेल्वे स्टेशनला देखील जोडेल, ज्यामुळे मेट्रो आणि रेल्वे दरम्यान बहुआयामी कनेक्टिव्हिटी निर्माण होईल.
अपेक्षित प्रवासी संख्या
अंदाजानूसार दोन्ही मार्गिकांवरील प्रवासीसंख्या ही 2028 मध्ये 4 लाखांच्या आसपास असू शकेल. हीच प्रवासी संख्या 2038 मध्ये 7, 2048 मध्ये 9.63 तर 2058 मध्ये 11.7 लाखांपर्यंत पोहचू शकेल असा अंदाज आहे. यापैकी, खराडी-खडकवासला कॉरिडॉरवर २०२८ मध्ये ३.२३ लाख प्रवासी असतील, जे २०५८ पर्यंत ९.३३ लाखांपर्यंत वाढतील, तर नल स्टॉप-वारजे-माणिक बाग स्पर लाईनवर याच कालावधीत प्रवासी संख्या ८५,५५५ वरून २.४१ लाखांपर्यंत वाढेल. हे अंदाज येत्या काही दशकांमध्ये लाईन ४ आणि ४ अ वरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ दर्शवतात.


