पुणे : मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीला राज्यमान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आता मराठी बोलणाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. आपली वाचनसंस्कृती जपण्याचे काम करायचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राज्यभर राबवता येईल, महोत्सवाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे आचार्य पवन त्रिपाठी, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरूणा ढेरे, लोकमान्य मल्टिपर्पज कॉ ऑप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, डॉ. सोमनाथ पाटील, विशाल चोरडिया, कृष्णकमार गोयल, संयोजन समिती सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एकाच लेखकाच्या सर्वाधिक पुस्तकांच्या प्रदर्शन याचा गिनेस विश्वविक्रम परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुंदर सुरिश्वर महाराज यांच्या नावे नोंदवला गेला. या विक्रमाचे प्रमाणपत्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एनबीटीला पुढील तीस वर्षांसाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पुणे पुस्तक महोत्सव इतका चांगला आहे म्हणूनच मी पुन्हा येईन, दरवर्षी येईन असे वाटते. पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा उपयुक्त दुसरे शहर नाही. पुणेकरांचा ज्ञानासाठी उत्साह आहे. शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम येत्या काळात महाराष्ट्रात करता येईल. असा महोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आयोजित केला जाईल. इतिहासात ग्रंथांचे महत्त्व मोठे आहे. आपले ज्ञान किती खोल होते याचे उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे. कलेपासून शल्यचिकित्सेपर्यंतचे ज्ञान तिथे दिले जायचे. या विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळल्यावर ती तीन महिने जळत होती. भारतीय सभ्यता सर्वांत प्राचीन आहे आणि ती चिरंतन सुरू राहिली आहे. चहुदिशांनी येणारे ज्ञान घेतले पाहिजे हे आपली संस्कृती सांगते. या देशाने नेहमी ज्ञानाची, ग्रंथांची पूजा केली. डिजिटल काळात ग्रंथ, पुस्तकांचे काय होईल याचे उत्तर तरुण पिढी देईल. एआय संकलन करू शकते, सृजन करू शकत नाही. तंत्रज्ञान ज्ञानाचे नवे दालन उघडून देते. तंत्रज्ञानामुळे कोणत्याही भाषांतील पुस्तके सहजपणे अनुवाद होऊन वाचता येतात. समाजातील मूल्ये टिकण्यासाठी वाचन संस्कृती टिकणे महत्त्वाचे आहे. येत्या काळात सर्वाधिक विश्वविक्रम करणारे शहर असा एक विक्रम नोंदवला जाईल. या महोत्सवासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून केली जाईल.
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, पुणे जिल्ह्यातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महोत्सव इतका मोठा झाला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला जावे, असे राज्यभरातील साहित्यप्रेमींना वाटावे असा हा महोत्सव होत जाईल. महाराष्ट्राची वाङ्मयीन परंपरा पुढे जाणारा, सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करणारा हा महोत्सव आहे.
मिलिंद मराठे म्हणाले, की लेखकांबरोबर काम करणे हे राष्ट्रीय पुस्तक न्यासचे उद्दिष्ट आहे. संपन्न साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातील लेखक, प्रकाशक, अनुवादकांबरोबर एनबीटी काम करणार आहे. त्यासाठी समन्वय बैठक आयोजित केली जाणार आहे. गणेशोत्सव, सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणे आता पुणे पुस्तक महोत्सव ही ओळख निर्माण होत आहे. एनबीटीकडून दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची पुण्यात सुरुवात करण्याचे नियोजन आहे. शांतता पुणेकर वाचत आहेत या धर्तीवर शांतता महाराष्ट्र वाचत आहेत असा उपक्रम राबवून वाचन संस्कृतीला देता येईल.
युवराज मलिक म्हणाले, एनबीटीचे दिल्लीनंतरचे सर्वांत मोठे कार्यालय पुण्यात होणार आहे. या कार्यालयात माता जिजाबाई कथाकथन केंद्र, मोफत ग्रंथालय, कार्यक्रमांसाठीचे सभागृह असणार आहे. पुणे पुस्तक महोत्सव देशांतील सर्वांत मोठ्या महोत्सवांपैकी एक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही फार मोठी घटना आहे. प्रकाशन व्यवसाय एक लाख कोटींचा आहे.
राजेश पांडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तकांवर प्रेम आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पुस्तकांवर मराठी माणसांचे प्रेम आहे. शांतता… पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात साडेचार लोक सहभागी झाले. चळवळीला जनतेचा आशीर्वाद मिळाला की सकारात्मक परिणाम कसा होतो याचे हा उपक्रम उदाहरण ठरला. १०१ महाविद्यालयांच्या सहभागातून ग्रंथदिंडी झाली. गेल्यावर्षीपेक्षा तिप्पट मोठे प्रदर्शन होणार आहेत. यंदा २५ लाख पुस्तके विकली जातील. हा महोत्सव पुण्याची गरज होती. संविधान शब्दाचा विश्वविक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दालन, लिट फेस्टमध्ये मान्यवर ४५ व्यक्ती सहभागी होणार आहेत. मुलांसाठी चित्रपट महोत्सव, सांस्कृतिक महोत्सवासह खाद्य महोत्सवाची मेजवानी मिळणार आहे.
पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक आणि परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुरीश्र्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने गिनेज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला आहे. पुस्तक महोत्सवाच्या तीन ‘ एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन ‘ अशा विषयाला अनुसरून हा विश्वविक्रम होणार आहे. हा विश्वविक्रम दुपारी बारा वाजता करण्याला सुरुवात होईल. साधारण चार वाजताच्या सुमारास आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिद्धार्थ जैन यांनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र स्वीकारले. पुणे पुस्तक महोत्सवातील हा दुसरा विश्वविक्रम होता. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विश्वविक्रम झाल्याने, उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रशासनाने यंदा चार नवीन श्रेण्या खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी तयार केल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.