पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत यंदा १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत पुणे लिट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या सहा दिवसीय साहित्यिक सोहळ्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधून चाळीसहून अधिक प्रज्ञावंतांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते १६ डिसेंबरला लिट फेस्टचे उद्घाटन होईल. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डीईएस नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. पांडे म्हणाले, की १३ ते २१ डिसेंबरदरम्यान फर्गसन महाविद्यालयात होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत पुणे लिट फेस्टने विचारांच्या आदानप्रदानाची स्वतंत्र परंपरा निर्माण केली आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी सत्रांची रेलचेल
पहिले तीन दिवस (१६ ते १८ डिसेंबर) मराठी साहित्यविषयक सत्रांची रेलचेल असेल. यात साहित्यिकांच्या जोडीने प्रशासन, उद्योग, संशोधन आणि समाजकारण क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या साहित्यविषयक अभिरुचीवर चर्चा होणार आहे. यासाठी शरणकुमार लिंबाळे, डॉ. वसंत शिंदे, जयंत उमराणीकर, प्रवीण दीक्षित, आनंद देशपांडे, अविनाश धर्माधिकारी, अश्विनी भिडे आदी मान्यवर सहभागी होतील.
त्यानंतर १९ ते २१ डिसेंबरदरम्यान हिंदी व इंग्रजी साहित्यविश्वाशी संबंधित चर्चांचे आयोजन केले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक, ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर, अभिनेता सचिन पिळगावकर, अभिनेत्री गिरीजा ओक यांच्यासारख्या मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.
गगनयान अंतराळवीरांशी संवाद
अंतराळवीर आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागरिकांना संवाद साधता येणार आहे. जुलै २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणाऱ्या शुक्लांचे विचार ऐकणे ही पुणेकरांसाठी अभिमानास्पद संधी असेल, असे पांडे यांनी सांगितले.


