जालना- मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नसल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मित्र पक्षांनी यादी न पाठवल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. जरांगे पाटील म्हणाले की, ‘आमचे १४ मतदारसंघ निश्चित झाले होते. उमेदवारांची नावे देखील निश्चित झाली होती. माझ्याकडे रात्री साडेतीन वाजता उमेदवारांची यादी होती. मात्र, आज सकाळपर्यंत मित्र पक्षांनी त्यांची यादी पाठवली नाही. त्यामुळे एका जातीवर कसे लढणार?’ असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे जरांगे पाटील म्हणाले की, ‘महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्ही कडचे नेते हे एकसारखेच आहेत. त्यामुळे कोणालाही पाठिंबा देत नाही. मात्र, माझे आंदोलन सुरू राहणार असून त्यात कोणी मला डिवचले तर, मी त्याला सोडणार नाही. ही माघार नसून गनिमी कावा आहे’, असेही त्यांनी म्हटले.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून कोणतीही कसर सोडली नाही. महायुती ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची आघाडी आहे. महाविकास आघाडी ही शिवसेना (यूबीटी) (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (एससीपी) (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाची आघाडी आहे.
राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोरी शमवण्यात महायुती आणि महाविकास आघाडी यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात उतरले असून एकूण १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.