24.3 C
New Delhi
Friday, March 14, 2025
HomeTop Five Newsराष्ट्रवादीने भाजपशी लग्न केलेले नाही-माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

राष्ट्रवादीने भाजपशी लग्न केलेले नाही-माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे ८ व्या युवा संसदेत २ रा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखत


पुणे : सन २०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक वर्ष भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात मळ्यात भूमिका होती. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपसोबत आहोत. आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २ रा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. तसेच काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे.

ते पुढे म्हणाले, तेलगी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला, परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत व ते सिद्धही झाले नाही त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे, तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला आज मंत्रिपद का मिळाले नाही ? याची खंत वाटते. मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही, परंतु मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी होतो, अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी भावना निर्माण झाली त्याचा निश्चितच फटका मला बसला आणि माझे मताधिक्य कमी झाले. परंतु तरीही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला असे अनेकांना वाटते, परंतु छगन भुजबळ चा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी माझा वापर कोणालाही करू देत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तुम्ही आता राज्यपाल होणार का? याविषयावर ते पुढे म्हणाले, राज्यपाल हे अतिशय मानाचे पद आहे. त्या पदाचा मी मान राखतो परंतु माझा स्वभाव हा अन्यायाविरोधात बोलण्याचा आणि संघर्ष करण्याचा आहे राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांसाठी बोलू शकत नाही, मला राज्यपाल करणे म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळ च्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच मी राज्यपाल पद स्वीकारू शकत नाही असे छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
24.3 ° C
24.3 °
24.3 °
34 %
1.6kmh
1 %
Thu
24 °
Fri
36 °
Sat
35 °
Sun
35 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!