sugar cane News | पुणे : शेतकरी हा केवळ अन्न उत्पादन करणारा घटक नसून ऊर्जा आणि पर्यायी इंधन निर्मितीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भविष्यात साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, जैवइंधन आणि इतर उपपदार्थांच्या निर्मितीकडे अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आयोजित साखर आणि जैवऊर्जा विषयावरील एकदिवसीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला हरिभाऊ बागडे, बाबासाहेब पाटील, दिलीप वळसे पाटील, बजरंग सोनवणे यांच्यासह साखर उद्योगाशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडकरी यांच्या हस्ते विस्माच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला मोठे महत्त्व प्राप्त होणार असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले की, विविध स्रोतांमधून इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात केंद्र सरकार सकारात्मक विचार करत असून, वाहन क्षेत्रात पर्यायी इंधनांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती शक्य असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करून कोणतीही गोष्ट वाया जाऊ नये, यासाठी उद्योगांनी कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. साखर उद्योगासमोरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सरकार आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांचा आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच साखर उद्योगाच्या भविष्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ऊसापासून तयार होणारे सहपदार्थ, ग्रीन हायड्रोजन, शाश्वत विमान इंधन, जैवइंधन निर्मिती तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा साखर उद्योगातील वापर या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आपल्या मनोगतात इथेनॉल क्षेत्रातील विकासाला अधिक गती देण्याची गरज व्यक्त केली. काही वर्षे इथेनॉल वापराला अपेक्षित चालना मिळाली नसल्यामुळे देशाने विकासाच्या काही संधी गमावल्याचे त्यांनी नमूद केले. साखर कारखान्यांनी क्षमता वाढविली असली तरी त्यानुसार ऊस उत्पादन, साखर उतारा आणि गाळप हंगामाच्या कालावधीतील बदल यांचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देणे अपरिहार्य असल्याचे मत व्यक्त केले. बदलत्या आर्थिक परिस्थितीत केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे उद्योगासाठी पुरेसे ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी साखर उद्योगासमोरील विविध अडचणींचा आढावा घेत दीर्घकालीन धोरणांची गरज अधोरेखित केली. साखर निर्यात धोरण अधिक स्थिर असावे, इथेनॉलच्या दरात वाढ व्हावी तसेच ऊसासाठी निश्चित करण्यात आलेल्या एफआरपी आणि साखरेच्या किमान विक्री किंमतीतील तफावत कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साखर उद्योगाला भविष्यात अधिक स्पर्धात्मक, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी जैवऊर्जा, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि इतर उपपदार्थ निर्मिती हीच पुढील वाटचाल ठरणार असल्याचा सूर या परिषदेत उमटला.


