एमआयटी डब्ल्यूपीयूत स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
‘स्टुडन्ट पीस अॅम्बेसेडर’ ने विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे- : ” स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये जागतिक धर्म परिषदेत भाकीत केले होते की विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. २१ व्या शतकात माझी भारत माता ज्ञानाचे दालन आणि विश्व गुरू म्हणून उदयास येईल.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १६४वीं जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतिने विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. हितेश जोशी आणि डॉ. भार्गव बिराडी उपस्थित होते.
विश्वशांतीच्या कार्यासाठी हातभार लावणारे विद्यार्थी कृष्णा पाटील, दक्षा उपासणी, निधी पानवाला, धैर्य अग्रवाल, भारवी चौधरी, रुद्राक्ष सुतार, अदिती खुराना, श्रेयस जोशी, हर्षा मुथा आणि अथर्व लोखंडे या विद्यार्थ्यांना ‘स्टुडेन्ट पीस अॅम्बेसेडर’ ने सन्मानीत करण्यात आले.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” स्वामी विवेकानंद यांनी भारताचा विचार जगासमोर मांडला. ते द्रष्टे व्यक्ती होते. धर्म, प्रार्थना आणि ध्यान या विषयी विचार जगासमोर ठेवले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा. युवकांमध्ये शक्ती समावलेली आहे. त्यांनी सतत धैर्य आणि शौर्याने पुढे चला. सदा प्रामाणिक रहा, स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” स्वामी विवेकानंद या शब्दाचे विस्तृतीकरण खूप सुंदर आहे. त्यात स्वामी म्हणजे स्वतःला जिंकणे, विवेक म्हणजे विवेकाबरोबर जगणे आणि आनंद म्हणजे स्वतःमध्ये आनंद शोधणे असा अर्थ होतो.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,”देशातील तरुणांना स्वामीच्या विचारांनी प्रेरित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. तरुणांवर जबाबदारी असल्याने त्यांनी स्वामीजींनी दाखविलेल्या मार्गावर चालावे.”
डॉ. मिलिंद पात्रे यांनी स्वागत पर भाषणात सांगितले की, भारत विश्वगुरू होणार ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यसाठी डॉ. कराड यांनी गेल्या ४० वर्षापासून जो ध्यास घेतला आहे. तसा ध्यास या सृष्टिवर कोणत्याही महापुरूषाने घेतलेला नाही.
या वेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात आणि सोशल मिडियाच्या जगात स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांवर चालल्यास जीवनात आनंदाचा झरा वाहेल.
सूत्रसंचालन विद्यार्थी वैभवी मैड आणि शौर्य शर्मा यांनी केले. डॉ. भार्गव बिराडी यांनी आभार मानले.


