30.1 C
New Delhi
Tuesday, April 14, 2026
HomeTop Five Newsभरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक !

भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक !


Navale Bridege Accident | पुणे- पुणे–मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या वाहनांच्या रांगेत घुसत सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.नवले पुलाजवळील सिग्नल परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्या वेळी सिग्नल लागल्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर थांबली होती. दरम्यान, कात्रज बोगद्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नवले पूल परिसरातील तीव्र उतारामुळे ट्रक थेट वाहनांच्या रांगेत घुसला आणि एकामागोमाग अनेक वाहनांना धडक दिली.

या अपघातात ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच TWO WHEELER मृत्यू झाला. तसेच इतर काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सिंहगड रस्ता पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम हाती घेतले.

अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. दरम्यान, या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या सुमारे सात किलोमीटरच्या अंतरात तीव्र उतार असल्यामुळे अनेकदा अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होतात आणि गंभीर अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या मार्गावर अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वाहनचालकांकडून या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.

यापूर्वीही नवले पूल परिसरात अनेक भीषण अपघात घडले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचे नियंत्रण सुटून त्याने दहा ते बारा वाहनांना धडक दिली होती. त्या वेळी लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर नऊ ते दहा जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते.

या सततच्या दुर्घटनांची दखल घेत वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांनी संयुक्तपणे काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही या भागातील अपघात पूर्णपणे थांबलेले नाहीत. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.

दरम्यान, नऱ्हे ते रावेत दरम्यान सुतारवाडीमार्गे उन्नत पुल उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मंजुरीही मिळाली आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती खासदार आणि केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वी दिली होती. या प्रकल्पामुळे भविष्यात या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
26 %
1.5kmh
20 %
Tue
32 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
42 °
Sat
41 °

Most Popular

Recent Comments