अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सांगता;
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित आठव्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. सामाजिक भान, वास्तववादी आशय आणि नव्या पिढीचा सहभाग हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. यावेळी ज्येष्ठ नाटककार प्रा. सतीश आळेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, सांस्कृतिक विभागाचे पंकज चव्हाण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे, दिग्दर्शक व परीक्षक सुनील सुकधनकर, उमेश कुलकर्णी, चित्रपट समीक्षक संतोष पाठारे, निलेश रसाळ, गायिका राधा खुडे, संयोजक संदीप ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे यांना ‘कलाकार निळू फुले कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना अनासपुरे म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. गावाकडून महानगरात आलेल्या कलाकाराचा संघर्ष हा ओळखीचा नसून जगण्यासाठीचा असतो.” रंगभूमीपासून चित्रपटापर्यंतचा आपला प्रवास संघर्षमय असल्याचे सांगत त्यांनी नाना पाटेकर आणि दिवंगत निळू फुले यांच्याकडून माणुसकी आणि कलेची खरी शिकवण मिळाल्याचे नमूद केले.
प्रा. सतीश आळेकर यांनी आपल्या भाषणात तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणावरचा सहभाग ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे सांगितले. लोकशाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी समाजाला योग्य दिशा दिली, असे नमूद करत अण्णाभाऊ साठे यांची कला ही प्रचारासाठी नव्हे, तर समाजाला जागं करण्यासाठी होती, असे त्यांनी स्पष्ट केले. कलेसोबत भाषा आणि विचार यांचा समन्वय साधणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
महोत्सवाचे संयोजक संदीप ससाणे यांनी सांगितले की, संघर्षातून उभा राहिलेला हा महोत्सव आज शासनाच्या भक्कम पाठबळामुळे अधिक सक्षम झाला आहे. सामाजिक आशय जपणाऱ्या चित्रपटांना व्यासपीठ देणे, हेच या महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रपट समीक्षक संतोष पाठारे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्येच अफाट ताकद आहे. त्यांच्या शब्दांतून केवळ आवाज नव्हे, तर जिवंत ध्वनी ऐकू येतो. तरुण दिग्दर्शकांनी हा वारसा नव्या ताकदीने पुढे नेणे हे आजचे मोठे आव्हान आहे.
दिग्दर्शक सुनील सुकधनकर यांनी राज्यातील छोट्या ठिकाणांहून होणारी चित्रनिर्मिती ही लोकशाहीसाठी आणि समाजासाठी आशादायक असल्याचे सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले असून, वंचित आणि शोषितांचे वास्तव या चित्रपटांतून ठळकपणे समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महोत्सवात विविध विभागांतील पुरस्कार जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार ‘द फर्स्ट फिल्म’ (दिग्दर्शक पियुष ठाकूर) यांना मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक गणेश शेलार, उत्कृष्ट छायाचित्रण प्रथमेश रंगोळे, उत्कृष्ट माहितीपट ‘ब्रीदिंग ब्ल्यू’ (दिग्दर्शक अविष्कार रविंद्र), उत्कृष्ट ध्वनी अभय रुमडे, उत्कृष्ट पटकथा गणेश शेलार, उत्कृष्ट संकलन हिमांशु पिले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनय विभागात विठ्ठल काळे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, वासुदेव निशाद यांना विशेष उल्लेख, नीता शेंडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विशेष उल्लेख, तर बालकलाकार आरव आहेर आणि जान्हवी सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कडू आणि हेमंत फरांदे यांनी केले. एकूणच, अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने सामाजिक जाणीव जपणाऱ्या कलावंतांना आणि नव्या विचारांना बळ देत एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मंच म्हणून आपली ओळख अधिक दृढ केली.


