–
पुणे, – श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम, तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखून विकासकामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनाकरिता तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे. मात्र, महाशिवरात्रीचा कालावधी (१२ ते १८ फेब्रुवारी २०२६) वगळून हा निर्णय लागू राहणार असून, या काळात मंदिर दर्शनासाठी खुले राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळात भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता, २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वांच्या सहमतीने मंदिर ९ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्याआधी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर, कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यामुळे कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
नित्य पूजा सुरू राहणार :
मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत नियमितपणे सुरू राहतील.
थेट दर्शन बंद :
या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही.
प्रवेशावर निर्बंध :
बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता इतर कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले :
“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान संस्थानने घेतला आहे. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन देवस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.”


