पुणे, -: “भारतीय संस्कृती सांगते की जो जन्माला आला आहे, तो समाजाच्या मदतीने जगेल; त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,” असे भावपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र, पुणे आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. हा सोहळा भांडारकर संस्था लॉ कॉलेज रोड येथे पार पडला.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, दत्तात्रय चितळे, सागर ढोले पाटील, विनय खटावकर, राजेंद्र जोग, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने सेवेच्या भावनेने काम करत एक नवीन जागतिक विक्रम रचला आहे. हा फक्त एक विक्रम नाही, तर सेवाभावी कार्याचा अविरत प्रवास आहे. भविष्यात हेच केंद्र आपला विक्रम पुन्हा मोडेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
त्यांनी या केंद्राचे नाव ‘दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ म्हणून अधिकृत करण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अलिम्को सारख्या संस्थांमुळे देशातच अत्याधुनिक कृत्रिम अवयव निर्मिती शक्य झाली आहे. हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवली जात आहे.”
राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत दिव्यांगांसाठी कार्यालये, संकेतस्थळे आणि इतर ठिकाणी सुगमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १०० दिवसांच्या कार्ययोजनेतही दिव्यांगांसाठी विशेष प्रावधान करण्यात आले आहे.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे यांनी सांगितले की, अवघ्या ८ तासांत ८९२ कृत्रिम हात व पाय अवयव दिव्यांगांना बसवले गेले. हा विक्रम गाठण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी हातभार लावला.
कार्यक्रमाच्या शेवटी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे परीक्षक स्वप्नील डांगरेकर यांच्या हस्ते भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राला अधिकृत जागतिक विक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.