38.4 C
New Delhi
Saturday, July 4, 2026
HomeTop Five Newsराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान

पुणे, – राज्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा उपकरण प्रदर्शनाचे आयोजन द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) यांच्या वतीने १३, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील नवीन कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणारे “मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो २०२६” हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे हे यंदाचे ७ वे वर्ष आहे.

या तीन दिवसीय प्रदर्शनात सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर रुफटॉप सिस्टिम्स, सोलर हायब्रीड सिस्टिम्स, स्ट्रक्चर्स, मायक्रो इन्व्हर्टर तसेच घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी विविध अत्याधुनिक उपकरणे पाहायला व खरेदीसाठी उपलब्ध असतील. या प्रदर्शनामध्ये ९६ हून अधिक सौर व अक्षय ऊर्जा उपकरण उत्पादकांचा सहभाग अपेक्षित असून, देशातील आघाडीच्या कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार, ईपीसी कंपन्या, वित्तीय संस्था, धोरणनिर्माते तसेच शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. छोट्या घरगुती गरजांपासून ते लघु व मध्यम उद्योगांसाठी लागणाऱ्या मोठ्या प्रकल्पांपर्यंत सर्व प्रकारची उत्पादने येथे उपलब्ध असणार आहेत.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील आणि ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (मेडा) चे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया (आयएएस), महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री विश्वास पाठक यांची भेट आणि मार्गदर्शन या निमित्ताने होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सौर उत्पादक, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, ईपीसी कंपन्या तसेच संबंधित घटकांचे प्रतिनिधित्व करणारी मास्मा ही गेल्या २५ वर्षांपासून अक्षय ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आघाडीची संघटना आहे. राज्यात सौर ऊर्जा स्वीकार, अक्षय ऊर्जा प्रसार आणि शाश्वत विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.

मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रदर्शनात सौर ऊर्जा क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, शासकीय अनुदान योजना आणि उद्योजकांसाठी उपलब्ध संधी याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक वाहनधारक तसेच लघु-मध्यम उद्योजकांनी या विनामूल्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सौर ऊर्जेचा वाढता वापर आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपायांचा प्रसार या उद्देशाने आयोजित केलेले हे प्रदर्शन राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
38.4 ° C
38.4 °
38.4 °
34 %
1.8kmh
100 %
Sat
38 °
Sun
43 °
Mon
36 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments