संशोधक समन्वय कृती समितीच्या शिष्ठमंडळने घेतली ना. पाटील यांची भेट
ना. पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज ना. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. ना. पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला.
सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी आदी संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या वतीने डेक्कन चौकात आंदोलन सुरु असून; त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीच्या शिष्टमंडाळाने आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत सविस्तर चर्चा होऊन अतिशय सकारात्मक चर्चा झाली.
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरविणे, शिष्यवृत्तीसाठी जाहिरात काढणे आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भात मंत्रालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी आश्वस्त केले.
तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. ना. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला.
यावेळी युवासेना नेते किरण साळी,नितीन आंधळे, पूजा झोळे, विद्यार्थी भारत पवार, अंकुश चौगुले, परिमल कुंभार, अभाविपचे राधेय बाहेगव्हाणकर, अलोक पवार, सई थोपटे आदी विद्यार्थी उपस्थित होते.