35.2 C
New Delhi
Sunday, July 5, 2026
HomeTop Five Newsदहावी-बारावी परीक्षांच्या नियमांत बदल

दहावी-बारावी परीक्षांच्या नियमांत बदल

पुणे, -फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांपूर्वीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर यंदा सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता, केवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचीच अदलाबदल करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी यंदा कर्मचारी अदलाबदलीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सर्वच परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची सरसकट अदलाबदल करण्यात आली होती. मात्र, त्याला शिक्षक संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता.

कॉपीमुक्त अभियानासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य मंडळ कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्य मंडळाचे अधिकारी, विभागीय अधिकारी, शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कर्मचाऱ्यांची सरसकट अदलाबदल केल्यास इयत्ता पाचवी ते नववी तसेच अकरावीच्या शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होतो, प्रत्येक पेपरच्या वेळी अन्य केंद्रांवर ये-जा करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे ठरते, तसेच खर्चही वाढतो, अशी भूमिका संघटनांनी मांडली.

या चर्चेतून असा निष्कर्ष काढण्यात आला की, ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत, अशाच केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करावी. त्यानुसार प्रस्ताव तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. राज्यातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याने सरसकट कर्मचारी बदलाची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या सर्व बाबी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने केवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.2 ° C
35.2 °
35.2 °
43 %
2.4kmh
32 %
Sun
43 °
Mon
40 °
Tue
39 °
Wed
40 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments