कक्षामार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यम, केबल नेटवर्क, दूरदर्शन वाहिन्या तसेच फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम, युट्यूब यांसारख्या समाज माध्यमांवर ठेवले जाणार लक्ष…
पिंपरी, – :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहरात आदर्श आचारसंहितेची प्रभावी, पारदर्शक व काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाज माध्यमांवरील राजकीय प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक जाहिरात नियंत्रणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आचार संहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने व उपायुक्त तथा आचार संहिता कक्षाचे नोडेल अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आदर्श आचार संहिता कक्षात कार्यकारी अभियंता विजय भोजने यांच्या अध्यक्षतेखालील नेमण्यात आलेल्या समितीमध्ये उप अभियंता शिरीष पोरेडी, निलेश दाते, हेमंत घोड, राहुल जन्नू यांचा समावेश आहे.
सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात देखील आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापलिका मुख्यालयात देखील आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहणार आहे. तसेच या कक्षामार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यम, केबल नेटवर्क, दूरदर्शन वाहिन्या तसेच फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम, युट्यूब यांसारख्या समाज माध्यमांवर तसेच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आदी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिराती, प्रचार संदेश, पोस्ट, व्हिडिओ, बॅनर व इतर प्रचार साहित्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
निवडणूक काळात कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बातम्या अथवा प्रचार साहित्य हे आदर्श आचारसंहितेच्या नियमांनुसार व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आहे की नाही, याची तपासणी व प्रमाणन संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी अ व ब प्रभागासाठी उप अभियंता शिरीष पोरेडी, क व ड प्रभागासाठी उप अभियंता निलेश दाते, ई व फ प्रभागासाठी उप अभियंता हेमंत घोड तर ग व ह प्रभागासाठी उप अभियंता राहुल जन्नू यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा मजकूर, दिशाभूल करणारी जाहिरात, आक्षेपार्ह संदेश किंवा नियमबाह्य प्रचार आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असून, तसेच आवश्यकतेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत समान संधी, निष्पक्षता व कायदेशीर शिस्त राखणे हा या नियंत्रण कक्षाचा प्रमुख उद्देश आहे.
—
कोट
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आदर्श आचार संहिता कक्षाच्या वतीने निवडणूक काळात सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावर प्रभावी नियंत्रण राहणार असून, नागरिकांना अचूक व सत्य माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे व लोकशाही मूल्यांना अनुसरून पार पाडण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका


