मुंबई- भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुरक्षेच्या सज्जतेसंदर्भात एक निर्णायक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यभरातील पोलिस, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि गुप्तचर यंत्रणांचा समग्र आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
या बैठकीत सुरक्षेच्या विविध अंगांचा तपशीलवार विचार करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्वाचे निर्देश दिले:
मुख्यमंत्र्यांचे ठळक निर्देश:
- प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल आणि वॉर रूम: जिल्हास्तरावर आपत्कालीन परिस्थिती (War room setup Maharashtra)हाताळण्यासाठी वॉर रूम सुरू करा व मॉकड्रिलद्वारे तयारी तपासा.
- महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द: आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन व इतर आवश्यक विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे.
- ब्लॅकआऊटसाठी रुग्णालयांना सज्ज करा: पर्यायी वीजपुरवठा, गडद पडदे यांसह रुग्णालयांचे नियोजन.
- ब्लॅकआऊट जनजागृती: विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ व माहितीप्रसार.
- सायबर सुरक्षा वाढवा: पाकिस्तानशी संबंधित संदिग्ध(Cyber security Maharashtra) सोशल मीडिया हँडल्सवर कारवाई, सायबर ऑडिट.
- फंड त्वरित उपलब्ध: जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार.
- सागरी सुरक्षेसाठी ट्रॉलर्स भाड्याने: समुद्रमार्गाने होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी उपाय.
- महत्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा: विशेषतः ऊर्जा आणि सायबर नेटवर्कचं ऑडिट करणे आवश्यक.
- सैन्य व कोस्टगार्डसोबत समन्वय: पुढील बैठकीत लष्करी दल व कोस्टगार्ड प्रमुखांना व्हीसीद्वारे सहभागी करणार.
संपूर्ण राज्यासाठी सज्जतेचा संदेश
राज्य शासनाने दिलेल्या या निर्देशामुळे स्थानिक प्रशासन, पोलिस व इतर यंत्रणांना एक स्पष्ट व सुसंगत दिशादर्शक मिळाला आहे. या पावलांमुळे संभाव्य धोके ओळखून, त्यास तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.