प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न!
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील रखडलेल्या SRA प्रकल्पांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SRA कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

या मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांतील विकासक बदलणे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे यावर अधिकाऱ्यांनी तत्त्वतः संमती दर्शविली.

तसेच मुंबईच्या धर्तीवर सर्व पात्र आणि अपात्र झोपडपट्टीधारकांना १५,००० रुपये घरभाडे देण्यात यावे या मागणीला देखील अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. अपात्र ठरविण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांच्या सर्व तक्रारींची सुनावणी घेऊन त्यांना पात्रतेचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात सर्वांना दर्जेदार घरे मिळावीत आणि प्रत्येक घराचे क्षेत्रफळ किमान ५०० चौरस फूट असावे अशी ठाम मागणी करण्यात आली.

मोर्चातील प्रमुख भाषणात बाळासाहेब आंबेडकर म्हणाले,
“५०० चौरस फूट घराच्या मागणीवरून तुम्ही मागे हटला नाहीत, तर लवकरच या विषयावर निर्णय घेता येईल. त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या.”
या मोर्चाच्या तयारीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात अनेक बैठका घेऊन संघटनात्मक नियोजन करण्यात आले होते. या नियोजनाची जबाबदारी ऍड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. अनिल अण्णा जाधव आणि ऍड. सर्वजीत बनसोडे यांनी सांभाळली.
मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळात
राष्ट्रीय महासचिव ऍड. प्रियदर्शी तेलंग, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ऍड. सर्वजीत बनसोडे, डॉ. अनिल जाधव,
पुणे अध्यक्ष ऍड. अरविंद तायडे, संजीवन कांबळे, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, माथाडी प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष लोखंडे, महासचिव अरुण कांबळे, पुणे महिला अध्यक्ष अनिताताई चव्हाण, पिंपरी महिला अध्यक्ष शारदाताई बनसोडे, पुणे युवक अध्यक्ष सागर आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
शिष्टमंडळाने SRA अधिक्षकांना बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर केले, त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजीवन कांबळे यांनी केले.


