पिंपरी चिंचवड – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे चिंचवड विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक अनंता कोऱ्हाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि पुणे–बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला.

या वेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर अजितदादा पवार म्हणाले, “अनंता कोऱ्हाळे हे लढवय्ये आणि जनतेशी घट्ट नातं राखणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात आणि संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळकटी मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, “अजितदादांच्या काम करण्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन येत्या काळात पिंपरी चिंचवड आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रात आणखी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील,” असे त्यांनी सांगितले.
अनंता कोऱ्हाळे यांच्या या पक्षप्रवेशामुळे चिंचवड मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.


