पंढरपूर,- : श्री विठ्ठल–रूक्मिणी मंदिर व पंढरपूर शहरातील परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन, संवर्धन व जिर्णोद्धाराची कामे शासन निधीतून पुरातत्व विभागामार्फत दि. 16 डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात आली आहेत. सदर आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विठ्ठल गाभारा, रूक्मिणी गाभारा, बाजीराव पडसाळी तसेच विठ्ठल सभामंडप येथील कामे पूर्णत्वास आली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
आराखड्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण व विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिनांक 30 डिसेंबर रोजी मंदिर समिती, पुरातत्व विभाग व ठेकेदार यांच्या समवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या समवेत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, बलभिम पावले, वास्तुविशारद श्रीमती तेजस्विनी आफळे तसेच संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील व परिसरातील परिवार देवतांच्या पूर्णत्वास आलेल्या मंदिरांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून भाविकांना दर्शनासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पंढरपूर शहर व परिसरातील सर्व परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन व संवर्धनाची कामे नियोजित पद्धतीने करण्याबाबत ठेकेदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
बाजीराव पडसाळी येथील श्री व्यंकटेश मंदिराच्या कामाचाही आढावा घेण्यात आला असून सदर मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच जतन व संवर्धनाच्या कामांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवून कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या.
पावसाळ्यापूर्वी सर्व वॉटरप्रुफिंगची कामे पूर्ण करण्याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंदिर जतन व संवर्धनाची सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याबाबत पुरातत्व विभागास सूचित करण्यात आले असून, सदर कामांचा लवकरच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला जाणार आहे.


