पंढरपूर: यंदाच्या आषाढी एकादशी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांसाठी १३ लाख ५० हजार बुंदी लाडू आणि ६० हजार राजगिरा लाडू प्रसादाची निर्मिती केली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली. यात्रेच्या कालावधीत मंदिर परिसरात आणि दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, प्रत्येक भाविकाला श्रींचा प्रसाद मिळावा यासाठी पुरेशा प्रमाणात लाडू प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनानंतर भाविकांना प्रसाद म्हणून दोन बुंदी लाडू (७० ग्रॅम) २० रुपये आणि दोन राजगिरा लाडू (२५ ग्रॅम) १० रुपये दराने मिळणार आहेत. हे प्रसाद पॅकिंग पर्यावरणपूरक कागदी पिशवीत केले जात आहे. प्रसाद वितरणासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार आणि श्री संत तुकाराम भवन येथे २४ तास खुले असलेले तीन स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा तेल, काजू, बेदाणा, विलायची अशा गुणवत्तापूर्ण पदार्थांपासून, अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार केला जात आहे. या लाडूंसाठी २५,००० किलो हरभरा डाळ, ३७,५०० किलो साखर, १७,००० किलो शेंगदाणा तेल, ५०० किलो काजू, ३७५ किलो बेदाणा, ३७ किलो विलायची आणि २,५०० ग्रॅम केशरी रंग वापरला गेला आहे. सर्व लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी करून खाण्यास योग्य असल्याची खात्री घेण्यात आली आहे.
या व्यवस्थेसाठी अनुभवी विभागप्रमुख भिमाशंकर सारवाडकर यांच्यासह १२० कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले की, भाविकांना स्वादिष्ट आणि सुरक्षित प्रसाद मिळावा यासाठी सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत.
