पिंपरी- : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनी ‘महा-मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, त्यांनी या निमित्ताने मेट्रोने महापालिकेत प्रवेश करत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास दाखवून दिला.

महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नुकतीच झाली आहे. सिंह यांच्या जागी हर्डीकर यांना महापालिका आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आज महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हर्डीकर यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येऊन हा पदभार स्वीकारला.
आयुक्त हर्डीकर यांनी महापालिकेत आल्यानंतर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार माजी खासदार, नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत आमदार अमित गोरखे हे देखील उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार अमित गोरखे यांचा संगीत खुर्ची व रस्सीखेच खेळात सहभाग….
महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच,संगीत खुर्ची यासह विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेले होते.आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार अमित गोरखे यांनी रस्सीखेच व संगीत खुर्ची या खेळात सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद अनुभवला.
त्यानंतर हर्डीकर यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीतील चौथ्या मजल्यावरील आयुक्त दालनात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागप्रमुख व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामकाजास सुरूवात केली.

नागरिकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू – आयुक्त श्रावण हर्डीकर….
आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहरातील स्वच्छता,पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांत सतत प्रगती साधली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने शहर विकासाच्या नव्या दिशा ठरवत, नागरिकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.’