15.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
HomeTop Five Newsपिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज!

पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज!

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर

पिंपरी, – – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, निवडणुकीचा प्रत्येक टप्पा अचूकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांचे चोखपणे नियोजन केले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यंत्रणेमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते भरारी पथकांच्या तैनातीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली असून, लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. शहरात एकूण ३२ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात ४ सदस्य याप्रमाणे एकूण १२८ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ६४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८१० असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३६ हजार ५३५ इतकी आहे. यानुसार अनुसूचित जातीसाठी २० जागा (पैकी १० महिला राखीव), अनुसूचित जमातीसाठी ३ जागा (पैकी २ महिला राखीव) आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३४ जागा (पैकी १७ महिला राखीव) निश्चित करण्यात आल्या आहेत.

महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून यामध्ये ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ स्त्रिया आणि १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १६ हा ७५ हजार १०५ मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग ठरला आहे, तर प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३३ हजार ३३ मतदार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी एकूण २ हजार ३४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रांची अधिकृत यादी २० डिसेंबर रोजी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणूक कामकाजासाठी प्रशासनाने ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून भक्कम यंत्रणा उभी केली आहे. एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २४ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे १४ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता पथक प्रमुख आणि उमेदवारांचे हिशोब तपासणी पथक प्रमुख यांचीही स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून, यामध्ये पोलीस आयुक्त व महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश आहे. याशिवाय, मतदान प्रक्रियेसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्रध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई (१० टक्के राखीव कर्मचारी) असे एकूण अंदाजे २०५० मतदान केंद्रांवर सुमारे १० हजार २५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

निवडणुकीच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी देखील आवश्यक बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रचार फेऱ्या, सभा आणि अवाजवी खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालय व क्षेत्रीय स्तरावर व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथके काम करतील. मतदारांवर प्रभाव टाकणे, प्रलोभन दाखवणे तसेच पैसे व मद्याची अवैध वाहतूक किंवा संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच शहराच्या विविध नाक्यांवर शस्त्रास्त्रे व अवैध वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी चेक पोस्ट पथके कार्यरत राहतील. आचारसंहिता भंगाची कोणतीही तक्रार आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी महापालिका व प्रभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत (SVEEP) व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शहरातील तरुण मतदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

उमेदवारांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार हे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील. तसेच मतदारांना आपले नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecvoterlist.in या अधिकृत संकेतस्थळावर ‘Search name in voter list’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे मतदारांना आपले नाव योग्य प्रभागात आहे की नाही हे तपासणे सोपे होईल, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी हर्डीकर यांनी दिली, तसेच शहरातील सर्व नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
77 %
0kmh
1 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!