बिकानेर, राजस्थान: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील देशनोक येथे आयोजित जाहीर सभेत पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.मोदी म्हणाले, “जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते; त्यांना मातीत गाडण्यात आले. ज्यांनी हिंदुस्थानचे रक्त सांडले; आज त्यांचा हिशोब चुकता झाला. भारत गप्प बसेल असं ज्यांना वाटत होते, ते आज त्यांच्या घरात लपून बसले आहेत. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा गर्व होता, ते आज त्याच्याच ढिगाऱ्यात गाडले गेले आहेत.” या शब्दांत त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना भारताने दिलेल्या प्रत्युत्तरावर प्रकाश टाकला.पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, “आता भारताची भूमिका स्पष्ट आहे… प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत पाकिस्तानचे सैन्य, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल.”
‘आता मोदींच्या धमन्यांमध्ये रक्त नाही, तर लखलखता सिंदूर वाहत आहे’ असे म्हणत मोदींनी आपल्या दृढ निश्चयाचे दर्शन घडवले. पाकिस्तानने एक गोष्ट विसरू नये की, “आता भारतमातेचा सेवक मोदी येथे ताठ मानेने उभा आहे. मोदींचे चित्त शांत आहे, ते शांतच राहते, पण मोदींचे रक्त सळसळते आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.