तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि २८ नगरसेवकांनी सोमवारी (२९ डिसेंबर) पदभार स्वीकारला. यानिमित्त आयोजित सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
समारंभास आमदार सुनील शेळके, श्रीमंत दाभाडे घराण्यातील अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, उमाराजे दाभाडे, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी बोलताना गेल्या ९ वर्षांतील नगरपरिषदेचा कारभार, प्रलंबित विकासकामे आणि निवडणुकीदरम्यानच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना त्यांचा पद हा प्रतिष्ठेसाठी नाही, तर जबाबदारीसाठी आहे असे सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला काम करावे लागेल. नगरपरिषदेची इमारत जितकी सुंदर, तितकंच सुंदर शहर घडविण्याची जबाबदारी तुमची आहे. मुख्याधिकारी नवीन प्रस्ताव तयार करतात, त्याचा पाठपुरावा करा आणि विकासकामांना गती द्या. मी आणि बाळा भेगडे निधीची कमतरता पडू देणार नाही, पण कुचराई झाली तर याबाबत हयगय करणार नाही.”
शेळके यांनी नगरसेवकांना धम्माकेदार शैलीत सांगितले, “तुम्हा सर्वांना मी नगरपरिषदेत रुबाबदार फेटा घालून आणलंय. पण जर कोणी जनतेच्या विश्वासाला तडा दिला तर त्याला पाणउतारा करायला मी कमी पडणार नाही. ही तुमची जबाबदारी आहे.”
यावेळी नगरसेवक गणेश काकडे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देत आमदार शेळके म्हणाले की, “अडीच वर्षांनी नगराध्यक्षपदाचा फेटा मी त्यांना घालीन.” उपस्थितांनी हास्याने दाद देत टाळ्या वाजवल्या.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सर्व नगरसेवकांसह एकत्र येत, “आपण जबाबदारीने काम करत राहू” असे आश्वासन दिले.


