पुणे: महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या सचिवपदी अभिषेक वसंतराव अवचार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर राज्याचे नियोजन व अंमलबजावणी प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश अबनावे उपस्थित होते.
पुण्यात वास्तव्यास असलेले अभिषेक अवचार सध्या युवक काँग्रेसच्या धोरण आणि संशोधन समितीचे राष्ट्रीय संयोजक आहेत. त्यांच्याकडे देशातील लोकसभा आणि विधानसभा क्षेत्राचे विश्लेषण करण्यासह विद्यापीठ स्तरावरील युवकांना काँग्रेसच्या धोरण व योजनांबाबत माहिती देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याअंतर्गत त्यांनी युवक काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर ‘हात से हात जोडो’ हे राष्ट्रीय जनसंवाद अभियान तयार करून देशात यशस्वीपणे राबवले.
या कार्याची दखल पक्षाने त्यांची महाराष्ट्र प्रदेशपदी सचिवपदी नियुक्ती केली आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राचे नियोजन व अंमलबजावणी या विभागाचे प्रमुख बनवण्यात आले आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब, राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा, राष्ट्रीय सचिव नवज्योत संधु व राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्लाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे. पक्षाची धोरणे व कार्यक्रम प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी अभिषेक अवचार सर्वोत्तम योगदान देतील, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केली आहे.


