Mohan Joshi Pune Congress | पुणे : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या नियुक्तीची घोषणा केली असून, जोशी यांनी महानगरपालिका क्षेत्रात विशेष प्रकल्पांतर्गत आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून प्रत्येक महापालिका क्षेत्रातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक माहिती संकलित करणे, तसेच पक्षाची स्थिती अधिक बळकट करण्यासाठी नियोजन करणे, ही जबाबदारी जोशींवर सोपविण्यात आली आहे.
दीर्घ राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क साधण्याची हातोटी लक्षात घेता, मोहन जोशी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांत प्रभारी म्हणून काम पाहण्याचा जोशींना अनुभव आहे. विशेष म्हणजे, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. यापूर्वी प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष आणि प्रदेश शहर काँग्रेस उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली असून, त्यांच्या संघटनात्मक अनुभवावर पक्षाचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त झाला आहे.


