पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. आज पहाटे साडेतीन वाजता पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आजारपणामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. पुण्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता आणि समर्थकांचा मोठा वर्ग त्यांच्यामागे उभा होता. याच जोरावर ते अनेक वर्ष पुण्याचे खासदार राहिले.
सुरेश शामराव कलमाडी असे त्यांचे पूर्ण नाव असून त्यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. ते भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष तसेच २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष होते. मात्र, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार व गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा खटला दीर्घकाळ न्यायप्रविष्ट राहिला.
या प्रकरणानंतर कलमाडी यांचे राजकारणातील वजन हळूहळू कमी होत गेले आणि त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतरही ते पुण्याच्या राजकारणात प्रभावी पुनरागमन करू शकले नाहीत.


