मुंबई :भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री व सध्याचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती निश्चित झाली असून, येत्या १ जुलै रोजी मुंबईत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
१ जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करतील. सध्या प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा चव्हाण घेणार असून, याबाबतची तयारी पक्षाकडून पूर्ण झाली आहे.
रवींद्र चव्हाण यांची जानेवारी २०२५ मध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतरपासूनच ते पुढील प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे २६ मे रोजी झालेल्या भाजप मेळाव्यात “भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण” असा उल्लेख करून त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले होते.
डोंबिवलीचे आमदार असलेले ५५ वर्षीय चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांना गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते, तेव्हापासूनच ते संघटनेच्या जबाबदारीकडे वळतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातही त्यांनी राज्यमंत्रिपद भूषवले होते.
पक्षाच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज मागविले जातील. चव्हाण यांचाच एकमेव अर्ज मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल. त्यानंतर ठाणे येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या नावावर अंतिम मंजुरी दिली जाईल.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती १२ ऑगस्ट २०२२ रोजी झाली होती. त्यांच्या कार्यकाळात भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, मात्र विधानसभेला चांगले यश मिळाले होते.
दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडही लवकरच होणार आहे. देशातील ५०% हून अधिक प्रदेशाध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातात. येत्या आठ-दहा दिवसांत काही अन्य राज्यांतही प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार आहे. संघ आणि भाजप यांच्या नेतृत्वातील महत्त्वपूर्ण बैठक ४ ते ६ जुलै दरम्यान दिल्लीत होणार असून, त्यादरम्यान राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.