माय मराठीसाठी लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर : विश्वास पाटील
सातारा : या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबा समवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल, तर वेळीच झोपेतून जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असुदे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असुदे तिचा गोंडा मराठीच असायला हवा, अशी आग्रही भूमिका ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी मांडली.
धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी, माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, महाराष्ट्रातच माय मराठीचे अध:पत होऊ नये या करीता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशागौशांची जत्रा नसते, कोणा वधू-वरांच्या लग्नाचे ते वऱ्हाडही नव्हे; तर महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती आणि अस्तित्वाला आकार व दिशा देणारी सर्वमान्य अशी प्रागतिक संघटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय, असे सांगून विश्वास पाटील पुढे म्हणाले, लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते. मात्र त्याला धर्म असतो. जो धर्म असतो तो फक्त मानवता धर्म! जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते. तेव्हा-तेव्हा गेल्या दोनशे वर्षात सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिहांसनासमोर झुकत नाहीत, हे या भूमितल्या साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
मराठीचे दालन दलित आत्मचरित्रांनी आणि कवितांनी, तसेच भटक्या विमुक्तांच्या कसदार लेखणीने समृद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा आणि ग्रामीण भागातून अनेक कवयित्री आणि बालसाहित्यातील मंडळी साहित्य शारदेच्या दरबारात जोमाने पुढे येऊन भर घालताना दिसतात.
महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता घोषित झाली आहे. तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता असते! तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त चारदोन आठवड्यांपुरती असते, तर साहित्य संमेलनाच्या मंथनातून निघालेल्या विचार शलाकांचा अंमल चार चार दशके सुद्धा टिकून राहतो हा या भूमीचा इतिहास आहे.
या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने ही संधी देशाच्या आझादीसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झुंज दिलेल्या एका कार्यकर्त्याच्या मुलाला मिळाली आहेच. पण त्याही पेक्षा एका अशिक्षित शेतकरी मातेच्या लेकरांकडे हे पद चालून आले आहे या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटतो. माझ्या साहित्यिक कारकीर्दीचा विचार करताना मला हाच प्रश्न पडतो, मी नेमका कोण आहे? झाडाझडती, लस्ट फॉर मुंबई, नागकेशर, दुडिया, अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान सारखी ग्रंथ संपदा लिहिणारा सामाजिक लेखक? की ऐतिहासिक कादंबरीकार? उजवा की डावा? माझ्या मते I am neither left, nor right, but I am upright. मी डावाही नाही आणि उजवाही नाही. मात्र माझ्या हाती मानवतेचे निशाण आहे. माझ्यातल्या कादंबरीकाराला सातारच्या सकस मातीने घडवले आहे ही वस्तुस्थिती आहे.
१८७८ मध्ये जे आमचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले, ज्याचा उल्लेख महात्मा फुल्यांनी ‘घालमोड्यादादांचे संमेलन’ असा उल्लेख नेहमी टाळीच्या एका वाक्यासाठी केला जातो. त्याच्या पल्याड खोलवर जाऊन तत्कालीन परिस्थितीचा अधिक गांभीर्याने विचार करायला हवा.
न्यायमूर्ती रानडे यांनी वयाच्या ३८व्या वर्षी साहित्य संमेलनाचा घाट घातला नंतर बावीस वर्षानी याच महादेव गोविंदानी ‘मराठा सत्तेचा उदयास्त’ नावाचा मौलिक ग्रंथ लिहून प्रबोधनाला खऱ्या अर्थी इथे चालना दिली. देशाच्या आझादीचे आंदोलन असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा नामांतराचा लढा अगर आणीबाणी सारखा प्रसंग. प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायकी वळणावार मराठी साहित्य संमेलन चार पावले आघाडीवरच राहिले आहे.
सातारा प्रांत म्हणजे साहित्यरत्नांच्या खाणी …
सातारा प्रांत म्हणजे एकीकडे इतिहासाच्या धडाडत्या तोफा आणि चौघडे आणि दुसरीकडे लोकसाहित्याचा पदन्यास… घुंगरांचा खणखणाट. सातारा प्रांत म्हणजे खऱ्या अर्थी साहित्यरत्नांच्या खाणी आहेत. ऐतिहासिक साताऱ्याची भूमी म्हणजे, निरा नदीच्या खळाळत्या पाण्यापासून ते पल्याड कोल्हापुराकडे वारणेच्या जलप्रवाहापर्यंत, तसेच एका बाजूला महाबळेश्वराच्या पर्वतरांगा आणि खाली पूर्वेकडे माणदेश-आटपडी ते पलीकडे मिरज, कवठे महांकाळ पर्यंत पसरलेला जुना विस्तीर्ण मुलुख आमच्या डोळ्यासमोर उभा रहातो. हीच ती पुण्यभूमी, जी थोरल्या शाहू महाराजांच्या वास्तव्याने महतपदास पोचली होती. याच भूमीतले महादजी शिंदे जे दिल्लीचे पाटीलबाबा बनले होते आणि ज्यांच्या इशाऱ्यानुसार हिंदुस्थानच्या गादीवर अर्धा डझन मुघल बादशहा बसले होते. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर अप्रतिम आणि अजरामर काव्य रचना करणारे संत रामदास स्वामी, सातारच्या वैभव आणि स्वायत्ततेसाठी ब्रिटिशांशी संघर्षाचं रान पेटवणारे थोरले प्रतापसिंह महाराज, त्या प्रजाहितदक्ष राजाची कैफियत मांडण्यासाठी इंग्लंडमध्ये धाव घेणारे, तिथे जाऊन नव्याने इंग्रजी शिकून आपल्या वक्तृत्वाने ब्रिटिशांची पार्लमेंट हादरवून टाकणारे रंगो बापूजी गुप्ते, ज्यांनी जगाला ‘राजा मेला तरी न्याय मेला नाही माझ्या सातारच्या गादीला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा सिहंगर्जना इंग्लंडमध्ये केल्या होत्या. ब्रिटिशांच्या विरोधात रानावनात स्वतःचे गरिबांचे राज्य या भूमीत निर्माण करणारा आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक. ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे प्रती सरकार निर्माण करणारे आमचे क्रांतीसिह नाना पाटील, जी डी लाड, नागनाथ नाईकवडी ते किसन वीर, धनिणीच्या बागेत रयत शिक्षण संस्था स्थापन करून शैक्षणिक क्रांति घडवणारे आमचे कर्मवीर भाऊराराव पाटील. तसेच इतिहासाच्या नभांगणात तेजस्वी तारकांसारख्या उजळलेल्या महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, महाराणी दुर्गाबाई, दिल्लीच्या दरबारात महाराणीचा अचाट अभिनय करून दिल्लीकर बादशहाला स्वतःला माँसाहेब म्हणून हाक मारायला भाग पडणाऱ्या मैनावती दासींसह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत या भूमीतल्या सर्व थोर माताभगिनींना मानाचा मुजरा.
प्राणिमित्रांनी समाजास वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये…
मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्या संबंधाचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आज शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिसिटी बोर्ड मर्यादीत वेळ वीज देते. त्यामुळे वाळणारी पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचे सापाच्या फणीवर पाय ठेऊन उसात उतरतात. आता तिथे बांधाबांधावर बिबटेभाऊ त्यांच्या स्वागतासाठी हजर आहेत. कोर्टामधून घाईघाईने हुकूम मिळवून प्राण्यांना आमच्यापासून दूर पळवणाऱ्या तथाकथित प्राणीमित्रांना आमच्या संस्कृतीचा आणि मानव व पशुंच्या पूर्वापार नात्यांचा इतिहासच ठाऊक नाही. हत्तीपालन आणि अश्वपालन सम्राट अशोका पासून शिवाजी राजांपर्यंत अनेक युगप्रवर्तक महापुरुषानी केले आहे. हत्तीघोड्यांचे पालन, संगोपन, आरोग्य व आहार या विषयावर पुरातन काळापासून शास्त्रोक्त विचार आणि संशोधन झालेले आहे. भारतीय सर्कशीची पाठराखण या भूमीमध्ये लोकमान्य टिळक, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी केली आहे. सर्कशीची जन्मभूमी केरळच्या आधी मुंबई प्रांत आणि त्यातही आमच्या पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील ‘तासगाव’ ही आहे. एकट्या तासगावात एकेकाळी राष्ट्रीय दर्जाच्या १५ सर्कशी होत्या. या पार्श्वभूमीवर मी बिबटे आणि रानटी हत्तीसारखे प्राणी मोकाट सुटण्या ऐवजी सर्कशीमध्ये वापरायला पुन्हा परवानगी द्या अशी समाजाला व शासनाला विनंती करतो. प्राणिमित्रांनी समाजास वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये.
पानशेतच्या प्रलयावर कादंबरी घडलेली नाही…
कादंबरी हा वाङ्मयप्रकार पूर्णतः परदेशी म्हणता येणार नाही. भेदीकीची रात्र रात्रभर चालणारी गाणी, सुबरानं मांडलं गा म्हणत धनगरांची रात्र रात्रभर ढोल आणि खैताळावर रंगणारी दीर्घ कथानके आणि त्यांचे पट कादंबरीसदृश्य आहेत. रामायण आणि महाभारताच्या कथा हा व्यास आणि वाल्मिकी सारख्या शब्दप्रभूंच्या लेखणीचा महाचमत्कार आहे. आपल्याकडे स्वातंत्र्याच्या आंदोलनावर किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या जनांदोंलनाची दाहकता दाखवणारी अगर ज्या पुण्यामध्ये बुद्धीचे बृहस्पती राहतात, त्या पुण्यातल्या पानशेतच्या प्रलयावर एखादी जबरदस्त कादंबरी घडलेली नाही.


