Pandharpur News – पंढरपूर, : श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरात संत नामदेव पायरीचे पूजन करून महाआरती केली. त्यांनी श्री संत चोखामेळा समाधी व श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समिती सदस्य, आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराजांचे वंशज आणि श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि विकास आराखड्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. “संतांचे जीवन समाजाला केवळ विचार देत नाही तर जीवनाचा मार्ग दाखवते. संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक स्वरूप दिले आणि वारकरी विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. त्यांच्या कार्यातून वारकरी परंपरेचे सामर्थ्य स्पष्ट होते. असे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे,” असे फडणवीस म्हणाले.
सोहळ्यादरम्यान विठ्ठल दर्शनाला तांत्रिक पंख मिळाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हीआर दर्शन’ (Virtual Reality) सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यामुळे देशभरातील भाविकांना विशेष गॉगलच्या साहाय्याने विठुरायाच्या महापूजा आणि विविध रूपांचे दर्शन घेता येणार आहे. यापूर्वी अशी सुविधा फक्त उज्जैन आणि काशी विश्वेश्वर येथे होती.
मंदिराच्या भक्तनिवासात व शहरातील ठिकाणी भाविकांना अल्प शुल्कात ही सेवा उपलब्ध राहणार आहे. गॉगलच्या माध्यमातून गाभाऱ्यात उभे राहून महापूजेचा आभास घेता येईल, ज्यामुळे वर्षभरात क्वचित होणाऱ्या महापूजांचा अनुभव सर्वांना घेता येईल.