पुणे – राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तयारी वेगात सुरू असताना शिवसेनेने प्रचाराची रणनीती ठरवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुणे जिल्ह्यातून शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे तसेच शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव आडसूळ, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे, मिना कांबळे यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, उपनेते आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात हे स्टार प्रचारक राज्यभर सक्रिय भूमिका बजावणार असून, पुणे जिल्ह्यातून डाॅ. गोऱ्हे आणि श्रीरंग बारणे यांची निवड पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे.


