29.2 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
HomeTop Five Newsआषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू

सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

     पंढरपूर  - दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी दिनांक 27 जून रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.

श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ॲड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

आषाढी वारीला आलेल्या वारकरी भाविकांच्या सोईसाठी मंदिर समिती सुसज्ज.

आषाढी एकादशी रविवार, दिनांक 06 जुलै रोजी आहे. या यात्रेला अंदाजे 12 ते 15 लाख वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, तात्पुरत्या स्वरूपातील उड्डाणपुले, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा खिचडी वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व खाते प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आषाढी यात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविणेकामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. पंरपंरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22.15 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे. याशिवाय, संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टिव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पुजा, महानैवेद्य, संतांच्या भेटी, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, प्रक्षाळपुजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.

याशिवाय, कर्मचा-यांना प्रशिक्षण, रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे. देणगी साठी जादा स्टॉलची निर्मिती व ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा, चंद्रभागा वाळवंट इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

 तसेच वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र, स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आहे. याशिवाय, आरोग्य विभागामार्फत दर्शनमंडप व पत्राशेड येथे आयसीयु, गोपाळपूर, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत.

 श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार, श्री संत तुकाराम भवन येथे स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच दर्शनरांगेत शाबुदाणा / तांदळाची खिचडी तसेच दासोह रत्न चक्रवती दानेश्वर महाराज श्री. बसवगोपाल नीलमाणिकमठ बंडिगणीमठ, बागलकोट या स्वयंसेवी संस्थेमार्फत पत्राशेड येथे भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.

मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांना किर्लोस्कर ग्रुपतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘किर्लोस्कर वसुंधरा सन्मान 2025’ प्रदान करण्यात आला असल्याने, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करून, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते तुळशीचा कंठा, उपरणे व श्रींची मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
3.2kmh
18 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!