पंढरपूर, :- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरातील सर्व्हे नं. 59 येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासात वास्तव्यास असलेल्या भाविकांना थेट श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे लाईव्ह दर्शन घेता यावे, यासाठी अत्याधुनिक एलईडी स्क्रीन बसविण्यात आली असून, भक्तीमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी भक्तीगीतांसाठी साऊंड सिस्टीम देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधांचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक 03 जानेवारी रोजी सायं. 6.00 वाजता भक्तनिवास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेशकुमार कदम यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास संजय कोकीळ, राजेंद्र सुभेदार, शंकर मदने, पांडुरंग बुरांडे, सावता हजारे राजेंद्र घागरे, संदीप कुलकर्णी, विशाल देवकते, भाऊसाहेब घोरपडे, अरुण सलगर, सिद्धार्थ खिस्ते, अनंता रोपळकर यांच्यासह भक्तनिवासातील कर्मचारी उपस्थित होते.
सदरची एलईडी स्क्रीन इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सेवाभावी योगदानातून उपलब्ध करून देण्यात आली असून, साऊंड सिस्टीम देखील अनिल भन्साळी पुणे या दानशूर देणगीदारांकडून सेवाभावी तत्त्वावर प्रदान करण्यात आली आहे. भक्तनिवासातील वातावरण अधिक भक्तीपूर्ण व शांत राहावे, भाविकांना निवासस्थानी असतानाच श्रींचे दर्शन व भक्तीगीतांचा आनंद घेता यावा, या हेतूने या सुविधा बसविण्यात आल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. कदम यांनी केले. याशिवाय, शासनाने जीएसटीमध्ये कपात केल्यानंतर भक्तनिवासातील खोल्यांचे दरही कमी करण्यात आले असून, भाविकांच्या सोयीसाठी www. vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या भक्तनिवासात सुमारे 1500 भाविकांची निवास व्यवस्था असून, व्यापारी गाळे, कार्यालये, उपहारगृह, गरम पाण्याची सुविधा, तबक उद्यान, प्रशस्त पार्किंग, लिफ्ट, सुरक्षा व्यवस्था, जनरेटर, वातानुकूलित सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. या कॅम्पसमध्ये ग्रीन बिल्डिंग मानांकन प्राप्त आकर्षक चार इमारती असून, 2 बेड, 5 बेड, 8 बेडच्या खोल्या, तसेच व्हीआयपी सूट व वन बीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत. याशिवाय 24 तास चेक-आऊट सुविधा देण्यात आली आहे. भक्तनिवासाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अनुभवी कर्मचारी श्री सावता हजारे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, सुमारे 130 विविध संवर्गातील अनुभवी कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या भक्तनिवासास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, भक्तनिवास येथे येणाऱ्या भाविकांना निवास, सुविधा व भक्तीमय वातावरण या तिन्हींचा एकत्रित अनुभव मिळणार आहे. वारकरी भाविकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न असल्याचे यावेळी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगितले.


