“फुलं जी देवाच्या चरणी अर्पण झाली, ती निर्माल्य नाहीत… ती तर पवित्रतेचं प्रतीक आहेत!”
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दररोज लाखो भाविक आपल्या भक्तीभावाने हार-फुलं अर्पण करतात. या फुलांची कहाणी इथंच थांबत नाही… आता हाच निर्माल्य – म्हणजे देवाला अर्पण झालेलं हे पवित्र फूल – नव्या रूपात तुमच्यापर्यंत येणार आहे, धूप आणि अगरबत्तीच्या सुगंधीत स्पर्शाने!
पंढरपूर,– श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दररोज लाखो भाविक तुळस, हार व फुले अर्पण करतात. या भक्तिभावाने अर्पण केलेल्या निर्माल्याचा शाश्वत व पर्यावरणपूरक वापर करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून, त्यानुसार या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार केली जाणार आहे.

या उपक्रमासाठी प्रभव आरोमॅटिक्स, पंढरपूरचे श्री ऋषिकेश भट्टड यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी आधीच काम सुरू केले असून, आषाढी वारी २०२५ पूर्वी भाविकांना विविध प्रकारच्या (तीन ते चार) धूप व अगरबत्त्या अल्प देणगी मूल्य आकारून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबाबत माहिती श्री विठोबा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यापूर्वी थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज, पुणे यांचाही प्रस्ताव निवडण्यात आला होता. परंतु त्यांनी काम सुरू न केल्यामुळे त्यांचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून प्रभव आरोमॅटिक्स यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून, श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप आणि श्री संत तुकाराम भवन येथे स्टॉल उभारून धूप व अगरबत्त्यांचे वितरण केले जाणार आहे. या कामाची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संबंधित कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच भाविकांना हे पवित्र सुगंधी उत्पादन मिळणार आहे.