नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो च्या पीसीएमसी ते स्वारगेट या सध्याच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज Pune metro अशा भूमिगत मार्ग प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली. या नवीन विस्तारित प्रकल्पाची Line-l B विस्तार अशी ओळख आहे आणि त्याचा विस्तार 5.46 किमी असेल. या विस्तारित प्रकल्पात तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल, जे मार्केट यार्ड, बिब्बेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज उपनगर यांसारख्या प्रमुख भागांना जोडेल.
पुण्यामध्ये अतिशय सुविहित दळणवळण सुविधा उपलब्ध करण्याचा उद्देश असलेला हा प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च रु. 2954.53 कोटी आहे, ज्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या समान वाट्यातून, तसेच द्विपक्षीय संस्था आदींच्या योगदानासह निधी पुरवला जाईल.
या विस्तारामुळे स्वारगेट मल्टीमोडल हबचे एकात्मिकरण होईल ज्यामध्ये मेट्रो स्थानक, एमएसआरटीसी बस स्थानक आणि पीएमपीएमएल बस स्थानकाचा समावेश आहे, जे पुणे शहरातील आणि बाहेरील प्रवाशांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची संपर्कव्यवस्था प्रदान करेल. या विस्तारामुळे पुण्याचा दक्षिणेकडील भाग, पुण्याचा उत्तरेकडील भाग आणि जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनद्वारे पूर्व आणि पश्चिम विभाग यांच्यातील संपर्कव्यवस्था वाढेल, ज्यामुळे पुणे शहरामध्ये आणि बाहेरील प्रवासासाठी सुविहित दळणवळण सुविधा मिळेल.
स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्गामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अपघात, प्रदूषण आणि प्रवासाचा वेळ यांची जोखीम कमी करून सुरक्षित, अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. अशा प्रकारे शाश्वत शहरी विकासाला मदत होईल. नवीन कॉरिडॉर विविध बसस्थानके, रेल्वे स्थानके, राजीव गांधी झूऑलॉजिकल पार्क, तळजाई टेकडी, मॉल्स आदी मनोरंजन केंद्रे, विविध निवासी क्षेत्रे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रे यांना जोडेल. हा प्रकल्प एक जलद आणि अधिक किफायतशीर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करेल, ज्याचा फायदा हजारो दैनंदिन प्रवाशांना, विशेषत: विद्यार्थी, लहान व्यावसायिक आणि कार्यालये आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांना होईल. या प्रकल्पांसाठी स्वारगेट-कात्रज मार्गावर 2027, 2037, 2047 आणि 2057 या वर्षांसाठी अंदाजे दैनंदिन प्रवासी संख्या अनुक्रमे 95,000, 1.58 लाख, 1.87 लाख आणि 1.97 लाख प्रवासी असण्याचा अंदाज आहे.
हा प्रकल्प महा-मेट्रोद्वारे राबवला जाईल, त्यांच्याकडून नागरी, इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि इतर संबंधित सुविधा आणि कामांवर देखरेख ठेवली जाईल. महा-मेट्रोने आधीच बोलीपूर्व व्यवहार सुरू केले आहेत आणि निविदा कागदपत्रे तयार केली जात आहेत, लवकरच बोलीसाठी कंत्राटे प्रसिद्ध केली जाण्याची अपेक्षा आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे पुण्याच्या आर्थिक क्षमतेचा सुयोग्य वापर होईल ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि त्याच्या शाश्वत विकासामध्ये योगदान मिळेल.