26.4 C
New Delhi
Wednesday, July 16, 2025
Homeदेश-विदेशप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आश्विनी जगताप, आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

उद्योग आणि पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात अग्रेसर
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहे, विविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे.

पुरंदर विमानतळाकरीता भूसंपादनाची कार्यवाही करा
पुरंदर विमानतळाकरीता लवकरात लवकर जागा अधिग्रहित करुन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, आगामी काळात पुरंदर विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याठिकाणी ऐतिहासिक स्मारक होत आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी
राज्य शासनाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ कोटी ९० लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे, याकरीता वर्षभरासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वे कोल्हापूर येथून आयोध्याकरीता सोडण्यात आली असून आगामी काळात राज्यासह पुण्यातून याकरीता प्रयत्न करावेत. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहील, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता मेट्रोच्या कामाला गती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या कामाला सन २०१४ पासून गती मिळाली असून यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन करुन हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील सर्वाधिक वेगाने काम पूर्ण होणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने मेट्रोचे काम करण्यात येत असून ही देशातील पहिली सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील मेट्रो आहे. स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानक ‘मल्टिमॉडेल स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असून अशाप्रकारचे देशातील पहिले स्थानक असणार आहे. आगामी काळात मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विविध भागात मेट्रोने प्रवास करता येईल, असे नियोजन केले आहे, असेही ते म्हणाले.

पुणे ही समाजसुधारकांची भूमी असून येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करुन देणारे स्मारक होणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षणाचा आणि समाजसुधारणेचा मिळालेल्या वारसाची आठवण करुन देणारे सुंदर असे स्मारकाचे काम सुरु होत असून ते आगामी ५०० वर्ष आपल्या प्रेरणा देत राहील, श्री. फडणवीस म्हणाले.

पुणे हे राज्याचे आर्थिक मॅग्नेट
पुणे ही सांस्कृतिक, तंत्रज्ञानाची राजधानी आहेच त्याचबरोबर पुणे हे आर्थिक ‘मॅग्नेट’ आहे. पुणे शहर व परिसरात सुमारे १ लाख कोटी रुपयांची कामे करीत आहोत. राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग इंजिन हे पुणे जिल्हा असून दुसरे आता छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम पुणेकरांच्या नावाला साजेसे-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे. आज जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत रेल्वेचे लोकार्पण होत असून स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरीता मेट्रोचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने काम करण्यात येत आहे. पुण्यात विविध सार्वजनिक विकासाची कामे सुरु असताना पुणेकरांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य करतो. परंतु, आगामी ५० ते १०० वर्षाचा विकास या माध्यमातून होणार आहे.

भिडेवाडा येथील या ऐतिहासिक स्मारकाकरीता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन राज्य शासनाने जागा ताब्यात घेतली आहे. जागेच्या भूसंपादनाकरीता अंदाजे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणच्या भूसंपादनामुळे बाधितांना योग्य तो मोबदला देण्याकरीता राज्य शासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल. भिडेवाडा स्मारकाकरीता १० कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. भिडेवाडा येथील स्मारकाचे काम उत्तम व दर्जेदार होईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

श्री. मोहोळ म्हणाले, केंद्र शासनाच्यामदतीने पुणे शहराला मेट्रो, आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन विमानतळाचे टर्मिनल, स्मार्ट सिटी, चांदणी चौकातील पूल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बस, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी वंदेभारत एक्सप्रेस, पुण्यात ३३ किमी मेट्रोचे मार्ग पूर्ण झाले आहेत. महिला सक्षमीकरणाकरीता बेटी-बचाव, बेटी पढाव, लखपती दीदी अशा योजना राबविण्यात येत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होत आहेत, असेही श्री. मोहोळ म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद- मंत्री छगन भुजबळ
मंत्री श्री. छगन भुजबळ म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य तसेच भिडेवाडा स्मारक येथील नूतन इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती देऊन मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विविध शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक सुधारणा केल्या. भिडेवाडा येथील स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा आंनद आहे, असही श्री. भूजबळ म्हणाले.

मंत्री श्री. चंद्रकांत पाटील प्रास्ताविकात म्हणाले, पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट येथून शहरातील विविध भागात जाणे शक्य होणार आहे. भिडेवाडा येथील स्मारक हा आपल्या श्रद्धेचा विषय मार्गी लागला आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
75 %
4.8kmh
25 %
Tue
29 °
Wed
36 °
Thu
29 °
Fri
34 °
Sat
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!