पुणे : “स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आपले रक्त सांडले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहत त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य कायम अबाधित ठेवण्यात, तसेच राष्ट्राच्या विकासात योगदान देणे आपले कर्तव्य आहे. सैन्यात जाऊनच देशसेवा करता येते, असे नाही. तुम्ही जे काम करत असाल, त्यातून देशाच्या विकासात योगदान देणे हेही देशसेवेचे कार्य आहे. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी समर्पित आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते भारतीय जवान रामधन गुर्जर यांनी केले.
बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. रामधन गुर्जर व इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ‘सूर्यदत्त’च्या वाद्यवृंदाने गायलेल्या गीतांनी आणि संगीतमय वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उद्योजिका सिम्पल जैन विशेष अतिथी म्हणून, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया, सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या संचालिका शीला ओका, प्राचार्य डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, प्राचार्य डॉ. आरिफ शेख, प्राचार्या किरण राव व वंदना पांड्ये, डॉ. सिमी रेठरेकर यांच्यासह सर्व विभागांचे संचालक व प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
रामधन गुर्जर म्हणाले, “सूर्यदत्त संस्थेने स्वातंत्र्यदिनी केलेल्या सन्मानाने प्रभावित झालो आहे. सैन्यात काम करताना अनेक शत्रूंशी लढा दिला. छत्तीसगडला कर्तव्यावर असताना २०१५ मध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागली. पण देशबांधवांच्या आशीर्वादाने थोडक्यात बचावलो. या मोहिमेतील शौर्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला. देशासाठी बलिदान देण्याची समर्पित वृत्ती आहे. आपण सर्वांनीही आपापल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे.”
सिम्पल जैन म्हणाल्या, “प्रत्येकाने आपले योगदान दिले, तर एकत्रित स्वरूपात मोठे कार्य उभे राहते. प्रत्येकजण संधीची वाट पाहत असतो आणि संधी प्रत्येकाला मिळते. त्यामुळे मिळालेल्या संधींचे सोने करणे आणि त्याचा चांगला उपयोग करून योग्य मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. आपले मन निर्मळ असावे. आपल्यातील क्षमता ओळखून त्यानुसार वाटचाल करावी. संस्कार, मानवी मूल्यांवर विश्वास ठेवून कठोर परिश्रमाने, निष्ठेने काम करायला हवे.”
कार्यक्रमाचे संयोजन सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट, तसेच मानवी भारताचा नकाशा साकारला. स्कुलच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीत गायले. देशभतीपर गीतांचे, तसेच समूहनृत्याचे सादरीकरण झाले. सूर्यदत्त संकुलातील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ या जोशपूर्ण घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
“आपल्याला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करायचे आहे. विश्वगुरू होण्यासाठी एकजुटीने प्रवास करायचा आहे. प्रत्येकाने यामध्ये योगदान देण्याचा संकल्प करावा. परिश्रम, सृजनात्मकता आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला पर्याय नाही. राष्ट्रसेवा हेच संस्थेचे प्रथम ध्येय आहे. संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या २५ वर्षांत सतत राष्ट्रीय कार्याचा पुरस्कार संस्थेने केला आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याबरोबरच राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्यात रुजविण्यावर भर दिला जातो.”
- प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया,
- संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन